Sangram Thopate: काॅंग्रेस हा पक्ष एक राष्ट्रीय पक्ष असताना सुद्धा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसला सर्वात कमी जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात काॅंग्रेस डबघाईला आल्याचे चित्र आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी काॅंग्रेसचे पुण्यातील प्रमुख नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यातच काॅंग्रेसला आणखी एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. कारण काॅंग्रेसचे प्रमुख नेते संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांणा उधाण आले आहे.
संग्रोम थोपटेंची राजकीय पार्श्वभूमी:
-संग्राम थोपटे हे भोर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले आहेत. त्यांचे वडील अनंतराव थोपटे यांनी तब्बल सहा वेळा याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे या भागात थोपटे घराण्याचा प्रभाव मोठा आहे. थोटपे घरण्याचे आणि शरद पवार यांच्यात तीव्र मतभेद होते हे संपूर्ण राज्याने पाहिले आहे. परंतु लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांनी भोरमध्ये जाऊन स्वत: अनंतराव थोपटे यांची भेट घेतली. ही भेट राजकीय हेतूतून झाली होती, कारण भोर मतदारसंघ लोकसभा निवडणुकीला बारामती मतदारसंघात येतो. या भेटीचा फायदा सुप्रीया सुळे यांना लोकसभेत झाला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या शंकर मांडेकर यांनीच संग्राम थोपटेंचा पराभव केला आहे.
– विशेष म्हणजे नाना पटोलेंनी जेव्हा राज्यातील काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता तेव्हा काॅंग्रेसकडून संग्राम थोपटेंना प्रदेशाध्यक्ष बनविण्याची रणनिती सुरू होती. मात्र शरद पवार यांनी याला विरोध केल्यानेच संग्राम थोपटे प्रदेशाध्यक्ष होऊ शकले नाहीत, असे म्हटले जाते. त्यानंतर काॅंग्रेसने हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष पद दिले.
– संग्राम थोपटे यांच्यावर संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेतील कथित गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. या प्रकरणी 14 जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे. मात्र वित्त विभाग सादर करणार असलेले शपथपत्र हे त्यांच्या विरोधात जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अलीकडच्या काळात काॅंग्रेस पक्षाला रामराम ठोकणारे नेते:
– महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
-मिलिंद देवरा यांनी देखील काँग्रेस पक्षाला सोडत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
-मुंबई महानगर पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी देखील काँग्रेस सोडून भाजप मध्ये प्रवेश केला आहे.
-संजय निरुपम यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका करत पक्षाचा राजीनामा दिला.
-तर आता संग्राम थोपटे भाजपच्या वाटेवर आहेत.
काॅंग्रेसला सोडून नेते का जात आहेत:
– जेव्हा नाना पटोले प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा काॅंग्रेस पक्षबांधणीत सपशेल फेल ठरली, अशी टीका अनेकांनी केली आहे. अर्थातच राज्यात गेल्या काही वर्षात काॅंग्रेसला सक्षम नेतृत्व न मिळाल्याने अनेकांनी पक्षप्रवेश केला.
– गेल्या काही वर्षांपासून काॅंग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वड्डेट्टीवार यांचा वाद जाहीर आहे. त्यामुळे काॅंग्रेसला जिथे गरज आहे एकी दाखवण्याची त्यावेळीच काॅंग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसला. त्यामुळे पक्षातील इतर नेते नाराज होताना दिसले.
– राज्यातील प्रमुख काॅंग्रेस नेते भाजपवर टीका करण्यात इतके मग्न झालेले दिसले की जनतेचे प्रश्न मांडण्याचा त्यांना विसर पडला, त्यामुळे आपआपल्या मतदार संघातील प्रश्न सोडवण्यासाठी काही नेत्यांनी पक्ष प्रवेश केला अशा चर्चा आहेत.
– तसेच निवडणुकीतील काॅंग्रेसची कामगिरी पाहता आपल्या राजकीय भविष्याचा विचार करत काही नेते पक्षप्रवेश करत असल्याच्या चर्चा देखील रंगत असतात.
– एकंदरित बैठकांचा अभाव, पक्षबांधणीकडे दुर्लक्ष आणि अंतर्गत वाद यामुळे अनेकांनी काॅंग्रेसला रामराम ठोकला अशा चर्चा सुरू आहेत.
दरम्यान, काॅंग्रेसचा जर असाच उतरता क्रम सुरू राहिला तर आगामी काळात काॅंग्रेसच्या महाराष्ट्रातील अस्तित्वार प्रश्नचिन्ह उभा राहू शकतो. कारण अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोरम, मेघालय, सिक्कीम, गुजरात, दिल्ली या राज्यातही काँग्रेसची राजकीय उपस्थिती लक्षणीयरीत्या कमी झालेली दिसत आहे.