Swargate Rape Case: स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात २५ फेब्रुवारी रोजी एका तरूणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण राज्य हादरून उठले होते. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेवर आता पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दत्ता गाडे याच्याविरोधात तब्बल ८९३ पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात आरोपीच्या गुगल हिस्ट्रीतून धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
गुन्हे शाखेने केलेल्या तपासात आरोपी दत्ता गाडे हा घटना घडण्यापूर्वी आणि नंतर वारंवार अश्लील व्हिडिओ पाहत असल्याचे त्याच्या गुगल सर्च हिस्ट्रीमध्ये आढळले आहे. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने ही माहिती उघड करण्यात आली असून, याला महत्त्वाचा पुरावा म्हणून आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आले आहे. या गंभीर गुन्ह्यानंतर पोलिसांनी अवघ्या ५२ दिवसांत हे आरोपपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. ए. मकानदार यांच्या न्यायालयात दाखल केले आहे. सरकारी वकील भाग्यश्री डागळे-संचेती यांनी हे आरोपपत्र सादर केले.
आरोपपत्रात एकूण ८२ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत, तर १२ पंचनामे सादर करण्यात आले आहेत. यात सीसीटीव्ही फुटेज, पीडित तरुणीने ओळख परेडमध्ये आरोपीला ओळखणे आणि महत्त्वपूर्ण अशा पाच पंचनाम्यांचा समावेश आहे, जे आरोपी घटनास्थळी हजर असल्याचे थेट पुरावे सादर करतात.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी आरोपीच्या वकिलांनी दावा केला होता की, आरोपी आणि पिडीतेची ओळख होती आणि हे सगळे पीडितेच्या सहमतीने झाले आहे. मात्र याची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता आरोपीचे वकिलांचा दावा खोटा ठरल्याचे दिसले. पीडित तरूणी आणि आरोपीची कसलीही ओळख नसल्याचे समोर आले होते. एकंदरित तपासात आतापर्यंत दत्तागाडे विरूद्ध काही ठोस पुरावे सापडत आहे. त्यामुळे दत्ता गाडेच्या अडचणी वाढल्या आहेत.