IPL SRH: प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये सध्या सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेड एका जाहिरातीमुळे चांगलाच अडचणीत सापडला आहे. उबेर या लोकप्रिय टॅक्सी सेवेच्या एका जाहिरातीत तो झळकला आहे. ही जाहिरात ५ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाली आहे. मात्र आता या जाहिरातीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. कारण या जाहिरातीविरूद्ध आरसीबीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
उबेर मोटो या बाईक टॅक्सी सेवेसाठी बनवलेल्या एका जाहिरातीत ट्रॅव्हिस हेड बंगळूरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये घुसून RCB च्या नावाचा उपहास करताना दिसत आहे, असा आरोप आरसीबीने केला आहे. ‘बॅडीज इन बंगळूरु’ असे या जाहिरातीचे नाव आहे आणि यात हेड ‘रॉयली चॅलेंज्ड बंगळूरु’ असे स्प्रे पेंटिंग करताना दिसत आहे. त्यामुळे आरसीबीने दावा केला आहे की, या जाहिरातीत त्यांच्या ट्रेडमार्कचा विनोदी पद्धतीने वापर करून संघाची प्रतिमा डागळली गेली आहे.
आरसीबीचे दावा केला आहे की, उबेर ही सनरायझर्स हैदराबाद अधिकृत प्रायोजक आहे आणि त्यांनी प्रतिस्पर्धी संघाचा आणि त्यांच्या ट्रेडमार्कचा अशा प्रकारे वापर करणे योग्य नाही. या जाहिरातीमुळे आरसीबीच्या ब्रॅंडवर नकारात्मक परिणाम झाला, असा दावा त्यांनी न्यायालयात केला आहे. विशेष म्हणजे, ट्रॅव्हिस हेड यापूर्वी आरसीबी संघाचा सदस्य होता आणि याचा वापर करून उबेरने अधिक नकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, असेही आरसीबीच्या वकिलांनी न्यायालयात स्पष्ट केले आहे.
दरम्यान, उबेरच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, ही जाहिरात केवळ विनोदी उद्देशाने बनवण्यात आली आहे आणि यात आरसीबीचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. ‘रॉयली चॅलेंज्ड’ हा शब्द यापूर्वीही अनेकदा आरसीबीच्या संदर्भात वापरला गेला आहे, असेही उबेरने आपली बाजू मांडताना म्हटले आहे. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणी अद्याप अंतिम निर्णय दिला नाही. त्यामुळे आता न्यायालय काय निकाल देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.