राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नुकतेच एक महत्वाचे वक्तव्य केले आहे. जातीय भेदभाव संपवून सामाजिक ऐक्य निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.त्यासाठी एक मंदिर, एक विहीर आणि एक स्मशानभूमी’ हे धोरण स्वीकारुन सर्व जातींमध्ये सुसंवाद आणि समानता आणली जावी. अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. रविवारी उत्तर प्रदेशमधील अलीगढमध्ये झालेल्या एका जाहिर कार्यक्रमात ते बोलत होते.
सरसंघचालक मोहन भागवत सध्या अलीगढच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान एका कायाक्रमातून स्वयंसेवकांना मार्गदर्शन करत असताना ते म्हणाले की,संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर हिंदू समाजात ऐक्य निर्माण करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. शाखांची वाढ ही माणूस घडवण्याच्या प्रक्रियेस गती देईल, आणि सामाजिक परिवर्तनाचा पाया मजबूत करेल.
एकमेकांना आमंत्रित करा.
स्वयंसेवकांना समाजातील सर्व घटकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करताना मोहन भागवत म्हणाले की संघाच्या स्वयंसेवकांनी समाजातील सर्व घटकांना एकमेकांच्या घरी आमंत्रित केले पाहिजे. “संघाचे स्वयंसेवक हे राष्ट्रप्रेमाने भारलेले असतात. त्यांनी समाजात जात-पात विसरून प्रत्येक घरात पोहोचावे, संवाद साधावा, त्यामुळे तळागाळात एकता आणि सौहार्दाचा संदेश दिला जाईल.
सण एकत्र साजरे करा
सणांच्या संदर्भात बोलत असताना त्याने एकत्र उत्सव साजरा करण्यावर भर दिला. सणांमध्ये सर्वांचा सहभाग असेल तर यामुळे राष्ट्रीयता आणि सामाजिक एकता मजबूत होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
कुटुंब प्रबोधनाची गरज
कुटुंबसंस्थेचे महत्व अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, “घरात एकत्रित पूजा, हवन व जेवण यामुळे बंध अधिक मजबूत होतात. कुटुंब म्हणजे संस्कारांची शाळा आहे आणि ती टिकवण्यासाठी एकोप्याची भावना आवश्यक आहे.”
भारताचं जागतिक नेतृत्व
ते पुढे म्हणाले, “आज जगात शांतता आणि सुखाचा मार्ग दाखवण्याची क्षमता फक्त भारतात आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे आहे. या पार्श्वभूमीवर संघाच्या स्वयंसेवकांनी अधिक जोमाने कार्य करावे,” अशी प्रेरणा त्यांनी दिली आहे.