Dr Shirish Valsangkar News: सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी १८ एप्रिल रोजी रात्री ८. ३० वाजता स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूरमधील मोदी परिसरात असलेल्या त्यांच्या घराच्या बेडरूममध्ये त्यांनी स्वतःवर गोळी झाडत जीवन संपवले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
डाॅ. वळसंगकर हे अत्यंत स्थिर आणि हुशार व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टरांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले, याबद्दल तर्कवितर्क काढले जात होते. परंतु डॉ. शिरीष वळसंगकर यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या आत्महत्येचे कारण स्पष्ट लिहिले आहे. चिठ्ठीत त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, ते रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकारी माने-मुसळे हिच्यामुळे आपले जीवन संपवत आहेत. या चिठ्ठीच्या आधारावर डॉ. वळसंगकर यांचे पुत्र डॉ. अश्विन वळसंगकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मनीषा माने-मुसळे हिला अटक केली आहे.
कोण आहे मनीषा माने-मुसळे?
समोर आलेल्या माहितीनुसार, मनीषा माने-मुसळे हिचे माहेर मरीआई चौक परिसरातील गवळी वस्ती येथे आहे. शिक्षण घेत असतानाच तिने वळसंगकर हॉस्पिटलमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली होती. अल्पावधीतच तिने आपल्या कामाने वळसंगकर कुटुंबाचा विश्वास संपादन केला आणि ती त्यांच्या घरात अगदी सदस्य असल्यासारखी वावरू लागली होती, असे तिच्या ओळखीचे लोक सांगत आहेत.
वळसंगकर कुटुंबात स्थान मिळवण्यासोबतच मनीषाने रुग्णालयातही वेगाने प्रगती केली. तिला प्रशासकीय अधिकारी पदापर्यंत बढती मिळाली आणि तिचा रुग्णालयातील दबदबा वाढला, असे म्हटले जाते. डॉ. वळसंगकर तिला आपल्या मुलीप्रमाणे मानत होते, असेही बोलले जाते. परंतु वळसंगर यांनी नेमके तिला आपल्या मृत्यूच जबाबदार का मानले आहे, हे मात्र अद्याप समोर येऊ शकले नाही. पुढील माहिती पोलिस तपासात समोर येण्याची शक्यता आहे.