दिल्ली महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीसाठी भाजपने महापौर आणि उपमहापौर पदांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपकडून महापौरपदाचे उमेदवार सरदार राजा इक्बाल सिंग व जय भगवान यादव हे उपमहापौरपदाचे उमेदवार असतील. अशी घोषणा दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी केली आहे.
राजा इक्बाल सिंग आणि जय भगवान यादव आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. आम आदमी पक्षाने एमसीडी महापौरपदाची निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर, त्यांची निवड आता फक्त औपचारिकता राहिली आहे. पुन्हा एकत्रित झालेल्या एमसीडीनंतर राजा इक्बाल सिंग हे पहिले भाजप महापौर असतील.
इक्बाल सिंग सध्या सभागृहातील विरोधी पक्षनेते आहेत. ते यापूर्वीच उत्तर दिल्ली महानगरपालिकेचे महापौर राहिले आहेत. दिल्लीत २५ एप्रिल रोजी होणाऱ्या एमसीडी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. महापौरांची निवड प्रत्येक आर्थिक वर्षाच्या पहिल्या बैठकीत केली जाते, जी सहसा एप्रिलमध्ये होते. विद्यमान महापौर निवडणुका होईपर्यंत पदावर राहतील. सध्या आपचे महेश खिंची हे पद भूषवत आहेत आणि निवडणुकीपर्यंत ते या पदावर राहतील.
दिल्लीत दर पाच वर्षांनी महानगरपालिका निवडणुका होतात, तर महापौरपदाच्या निवडणुका दरवर्षी होतात. एप्रिल २०२४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे वेळेत मंजुरी मिळू शकली नाही, त्यामुळे शेवटची महापौरपदाची निवडणूक नोव्हेंबर २०२४ मध्ये झाली होती.