Raj Thackeray Udhav Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा अधून मधून कानावर येत असतात. परंतु यावेळी या चर्चेला अधिक जोर मिळाला कारण स्वत: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी केलेले सूचक वक्तव्य. कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद, भांडणं अत्यंत किरकोळ आणि लहान आहेत, महाराष्ट्र फार मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणे आणि वाद अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणे- एकत्र राहाणे यात फार काही कठीण गोष्ट आहे, असे मला वाटत नाही. परंतु हा विषय इच्छेचा आहे. हा माझ्या एकट्याच्या इच्छेचा विषय नाही. आपण महाराष्ट्राच्या एकूण चित्राकडे आपण पाहिले पाहिजे. मला तर वाटते सगळ्या पक्षातल्या मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा, असे नुकतेच राज ठाकरे एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत.
तर राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनीही झटकन उत्तर दिले आहे. किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मीही तयार आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मराठी माणसांना एकत्र येण्याचे मी आवाहन करतो. पण एकीकडे त्यांना भाजपाला पाठिंबा द्यायचा आणि नंतर तडजोड, विरोध करायचा असे चालणार नाही. महाराष्ट्राच्या आड जो कोणी येईल त्याचे आगत-स्वागत करणार नाही, त्याच्या पंगतीला बसणार नाही हे आधी ठरवा. मी माझ्याकडून भांडणं मिटवून टाकली पण आधी हे ठरवले पाहिजे. अर्थातच दोन्ही नेत्यांनी केलेली वक्तव्ये हेच दर्शवतात की, आमची सोबत यायला हरकत नाही. या निमित्ताने आपण राज ठाकरेंच्या मनसेच्या राजकीय प्रवासावर प्रकाश टाकूयात.
राज ठाकरेंनीविठ्ठलाबद्दल तक्रार नाही मात्र भोवतीच्या बडव्यांबद्दल आहे असे म्हणत शिवसेनेला पक्षाला राम राम ठोकत २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष काढला.शिवसेनेप्रमाणेच स्थापनेच्या सुरवातीच्या काही वर्षांमध्ये मनसेनेही मराठीचा मुद्दा, मराठी पाट्यांचा मुद्द्यावर लक्षकेंद्रीत केले होते. 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत मनसेला केवळ १ जागा मिळाली होती. त्यानंतर २०१९ विधानसभा निवडणूकीतही मनसेला १ जागा मिळाली होती, यंदाच्या निवडणुकीत मात्र मनसेला एकही जागा न मिळाल्याने त्यांच्या पक्षमान्यतेवरही प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या गेल्या काही वर्षातील भूमिका:
-राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर सुरुवातीला मराठी अस्मितेवर आधारित राजकारण केले. तसेच त्यांनी परप्रांतीयांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसले. तर बाळासाहेब गेल्यानंतर उद्धव ठाकरेंकडे नेतृत्व आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका पुढे ठेवली, पण त्यांची भूमिका अधिक संयमित राहिल्याचे अनेकजण म्हणतात.
-२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमध्ये सामील होत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली. तर राज ठाकरे यांनी वेळोवेळी भाजपला पाठिंबा दिला आहे. तर कधी एकटेच स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका घेतलेली दिसते. त्यामुळे त्यांची राजकीय भूमिका बदलत राहते असा हल्लाबोल राज ठाकरेंवर सातत्याने होत असतो.
-या दोन्ही नेत्यांनी अनेकदा एकमेकांवर जाहीरपणे टीका केली आहे. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या धोरणांवर आणि नेतृत्वावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत तर द्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या बदलत्या राजकीय भूमिकेवर टीका केली आहे.
मात्र सध्या राज ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची राजकीय परिस्थीती काहीशी सारखी झाली आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारण उद्धव ठाकरेंसोबत जे नेत आहेत तेही त्यांची साथ सोडताना दिसत आहेत. त्यामुळे ठाकरेंचा पक्ष सध्या डबघाईला आला आहे चर्चा रंगत असतात. तर राज ठाकरेंना या विधानसभेत एकही जागा न मिळाल्याने त्यांचाही पक्ष डबघाईला आला आहे, अशा चर्चा रंगत असतात. त्यामुळे तसे पाहायला गेले तर दोन्ही नेत्यांना सध्या एकमेकांची गरज आहे.
आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यानुसार ते एकत्र आले तर त्याचा मोठा फायदा त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत होईल. कारण या दोन्ही पक्षांचा मराठी मतदारांवर प्रभाव आहे. त्यामुळे, ते एकत्र आल्यास मराठी मतदारांची मोठी शक्ती तयार होऊ शकते. तसेच मुंबईमध्ये दोघांच्या पक्षाचे राजकीय वर्चस्व आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेवर ठाकरे घराण्याची सत्ता कायम ठेवण्याच्या दृष्टिकोणातून या दोन्ही नेत्यांची युती महत्वपूर्ण ठरू शकते.