प्रस्तावना,
महाराष्ट्राची ओळख ही केवळ ऐतिहासिक राजसत्तांनी किंवा भूगोलाने ठरत नाही, तर तिच्या संतपरंपरेने घडवलेल्या विचारविश्वामुळेही होते. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ, चोखामेळा, बहिणाबाई यांसारख्या संतांनी इथल्या भूमीत नुसती भक्ती रुजवली नाही, तर एका व्यापक सामाजिक जाणीवेची बीजं पेरली. ही परंपरा केवळ अध्यात्मिक नव्हती; ती सामाजिक, सांस्कृतिक आणि मूल्यप्रधान होती. समाजात जेव्हा भेदभाव, विषमता, आणि धार्मिक कर्मकांडांनी माणूसपण हरवायला सुरुवात केली, तेव्हा या संतांनी ‘माणूस’ या मध्यवर्ती मूल्याला पुन्हा केंद्रस्थानी आणलं.
संतांच्या विचारांचा गाभा हा “सर्वांना समान मानणं” आणि “भक्तीचा मार्ग साऱ्यांसाठी खुला” या तत्त्वांवर आधारित होता. ज्ञानेश्वरांनी ‘अमृतानुभव’ आणि ‘ज्ञानेश्वरी’तून ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवलं आणि “जो जे वांछिल तो ते लाहो” असं म्हणत लोकांच्या इच्छांचा आदर करणारा, लोकाभिमुख धर्म मांडला. तर तुकोबांनी त्यांच्या अभंगातून समतेचे महत्त्व, भेदभावाचे दुष्परिणाम आणि सर्वांना समान मानण्याची शिकवण दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “अवघी एकाचीच वीण तेथे कैचे भिन्नभिन्न”. याचा अर्थ आहे की, सर्व जीव एकाच देवाची लेकरे आहेत, त्यामुळे त्यात जात, धर्म, वर्ण, लिंग यावरून कोणत्याही भेदभावाला स्थान नाही.
नामदेवांनी त्यांच्या अभंगांमधून जातिनिर्मूलनाचा विचार दिला आणि एकनाथांनी ‘एकनाथी भागवत’मधून अस्पृश्यांना मानाचं स्थान दिलं. चोखामेळा हे तर दलितांच्या वेदनेचा आवाज होते, ज्यांनी “माझे मळवट कुंकवाचे, तरी नाचतो वैकुंठाचे”असं म्हणून भेदाची भिंत मोडली. तर संत बहिणाबाईंच्या कविता स्त्रीच्या दु:खांची व समतेची साक्ष असलेल्या आहेत. या सर्व संतांची शिकवण ही लोकवाणी होती. त्यांच्या शब्दांनी लोकांच्या हृदयाला स्पर्श केला. त्यांनी क्लिष्ट वेदांचे भाष्य केले नाही, तर सामान्य जनतेच्या भाषेत सत्य मांडलं. हे संत मंदिरांच्या दारात थांबले नाहीत. ते लोकांच्या दारापर्यंत पोहोचले.
ज्या राजाचे नाव उच्चारताच आजही स्पुल्लिंग पेटून उठतात. अशा महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील भेदभावाला स्थान नव्हते. अठरा पगड जातींना सोबत घेऊनच त्यांनी स्वराज्य निर्माण केले. त्यांचा लढा हा कोणत्याही धर्माविरुद्ध कधीच नव्हता तर, अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध होता. ज्या परकीय शक्तींनी भारतात येऊन आपला धर्म वाढवण्यासाठी हिंदुंची मंदिरे फोडली, मुर्त्या फोडल्या जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणले अशा धर्मांध शक्तींविरुद्ध त्यांचा लढा होता. स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या या सर्व परकीयांना अद्दल घडवून त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. त्यानंतर सर्वसामान्य व्यक्ती सुरक्षितपणे राहू लागला. अशा मोठ्या शूरवीर राजाच्या शौर्याचा आणि संतांच्या शिकवणीचा वारसा या महाराष्ट्राला लाभला आहे.
पण इथे एक मोठा विरोधाभास लक्षात येतो. एवढ्या महान संतांचा आणि महापुरूषांचा वारसा असूनही महाराष्ट्रात जातीय तेढ, धार्मिक दंगली आणि विषमतेचे प्रकार वारंवार घडत आहेत. हे आपल्याला अस्वस्थ करणारं वास्तव आहे. संतांच्या भूमीत माणसांमध्ये इतका दुरावा, इतका द्वेष का? याचा अर्थ एवढा मोठा वारसा आपण केवळ गौरवास्पद ठेवा म्हणून जपतो, पण तो आचरणात आणत नाही. संतांच्या शिकवणुकीने महाराष्ट्रात सामाजिक बदल घडवले खरे, पण आजही समाज का तुटलेला आहे? संतांचा “समतेचा विचार” कुठे हरवला? की आपणच त्याला विसरलो? या सिरीजमधून आपण याच गोष्टींचा शोध घेणार आहोत
या सिरीजचा प्रवास “भूतकाळातील प्रकाशाच्या शोधातून वर्तमानाच्या अंधारावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न” असेल. यामध्ये आपण महाराष्ट्राला व्यापक अशी संत परंपरा लाभली असतानाही राज्यात दंगली का घडत आहेत? द्वेषाचा प्रसार कसा होतो? जातीपातीत न अडकता हिंदू म्हणून एकत्र एकत्र येण का गरजेचे आहे. जेंव्हा धार्मिक दंगली घडतात तेंव्हा यात माध्यमांची भूमिका काय असते? आणि आजचा समाज इतका ध्रुवीकृत होत असताना यावरती उपाय काय? या आणि अशा अनेक मुद्यांचा उहापोह आपण निष्पक्षपणे करणार आहोत. तूर्तास आजच्या भागाला इथेच पूर्णविराम देऊयात.
या सिरीजचा पुढचा भाग- भाग 2: महाराष्ट्रातील धार्मिक दंगलींची पार्श्वभूमी