सोमवारी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्याकडे दुहेरी नागरिकत्व असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेसंदर्भात सुनावणी पार पडली. यासंबंधीचा अंतिम अहवाल सादर करण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने अतिरिक्त मुदत दिली आहे. केंद्र सरकारने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबत १० दिवसांच्या आत स्पष्ट अहवाल द्यावा असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ मे रोजी होणार आहे. राहुल गांधी यांच्याकडे दुहेरी नागरिकत्व असल्याचा आरोप करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
राहुल गांधी हे युनायटेड किंग्डमचे नागरिक आहेत, असे म्हणत त्यांच्या लोकसभा उमेदवारीच्या पात्रतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. याचिकाकर्त्याने म्हटले आहे की राहुल गांधी यांचे कथित नागरिकत्व देशाच्या कायद्याचे उल्लंघन करते, जे दुहेरी नागरिकत्वाला परवानगी देत नाही.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, गृह मंत्रालयाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांनी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि अंतिम अहवाल दाखल करण्यासाठी अधिक वेळ मागितला व न्यायालयाने ही विनंती मान्य केली आणि अंतिम मुदत वाढवून पुढील सुनावणी ५ मे रोजी ठेवली आहे.
दरम्यान, आता ५ मे रोजी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.