आजपर्यंत गाडीचा कर्णकर्कश हॉर्न वाजला की लोक वैतागायचे पण आता लवकरच तुम्ही गाड्यांच्या हॉर्नमधून बासरी, तबला किंवा हार्मोनियमसारखे भारतीय वाद्यांचे सुमधुर सूर ऐकू शकता. होय, हे खरं आहे! केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच अशी माहिती दिली की, केंद्र सरकार अशा एका कायद्याचा विचार करत आहे, ज्याअंतर्गत सर्व वाहनांच्या हॉर्नमध्ये भारतीय वाद्यांवर आधारित ध्वनी वापरले जातील.
सोमवारी (२१ एप्रिल) झालेल्या एका वृत्तपत्राच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.गडकरी म्हणाले, “आपल्या हॉर्नचा आवाज इतका कर्कश असतो की, ऐकताना त्रास होतो. पण जर हॉर्न बासरीसारखा गोड किंवा तबल्यासारखा लयबद्ध झाला, तर तो ऐकायला आनंददायी वाटेल.” ते एका वृत्तपत्राच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
प्रदूषणावरही जोरदार फोकस
हॉर्नच्या आवाजाशिवाय वाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदूषणावरही सरकार लक्ष देत आहे. सध्या देशातील वायू प्रदूषणात वाहतूक क्षेत्राचा सुमारे 40 टक्के वाटा आहे. त्यामुळे जैवइंधन, मिथेनॉल, इथेनॉल यावर चालणाऱ्या गाड्यांना सरकारकडून प्रोत्साहन दिलं जातंय.
भारताची ऑटोमोबाईल शक्ती
गडकरी यांनी हेही सांगितलं की, भारताला दुचाकी आणि कारच्या निर्यातीतून सर्वाधिक महसूल मिळतो. भारत सध्या जगातील तिसरी सर्वात मोठी वाहन बाजारपेठ आहे. 2014 मध्ये भारताचे ऑटोमोबाईल क्षेत्र 14 लाख कोटी रुपयांचे होते, जे आता 22 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. फक्त अमेरिका आणि चीन भारताच्या पुढे आहेत.
गाड्यांच्या हॉर्नमध्ये मधुर भारतीय वाद्यांचा आवाज हा बदल केवळ हॉर्न च्या आवाजातील सुधारणा नाही, तर भारतीयत्वाचे, स्वदेशीवादाचे आणि भावनिक राजकारणाचे एक चपखल उदाहरण आहे.
गडकरी हे ‘रस्ते आणि पूल’ जसे तातडीनं बांधतात, तसंच ते समाजात सौंदर्य निर्माण करण्याचाही विचार करतायत, हे महत्त्वाचं आहे. वस्तूतः ही कल्पना एकदम हटके, वेगळी आणि कल्पक आहे.
गडकरी यांच्या दृष्टिकोनात नाविन्य आहे, आणि त्यांचा सामाजिक-भावनिक अँगलही विचारात घेण्यासारखा आहे. पण याची अंमलबजावणी करताना तांत्रिक, आर्थिक आणि व्यावहारिक अडचणींवर काटेकोर उपाय हवेत. जर “वाद्याच्या सूरांसह सुरक्षित आणि आनंददायक वाहतूक” शक्य झाली, तर ती केवळ धोरण नव्हे तर एक सांगीतिक क्रांती ठरू शकते!