जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभर खळबळ उडाली आहे. या भयानक हल्ल्यात २७ नागरिकांचा मृत्यू झाला असून, यात महाराष्ट्रातील नागरिकांचाही समावेश आहे. या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळी जाऊन सर्व माहिती घेतली आहे. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली असून आज तिथल्या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय सुरक्षा दल हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
या हल्ल्यानंतर पाकिस्तानने नेहमीप्रमाणे आपल्यावरचा दोष झटकला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं आहे की, “या हल्ल्याशी पाकिस्तानचा काही संबंध नाही. आम्ही अशा हल्ल्यांचा निषेध करतो.” पण या वक्तव्यानंतर त्यांनी भारतावरच आरोप करत म्हटलं की, “भारतामध्ये लोक सरकारविरोधात आहेत, नागालँड, मणिपूर आणि काश्मीरमध्ये लोक संतप्त आहेत, त्यामुळे अशा घटना घडतात.”त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे, कारण हे वक्तव्य दहशतवाद्यांना पाठीशी घालणारे वाटते.
दरम्यान, संरक्षण मंत्रालयात मोठी बैठक सुरु आहे. ज्यामध्ये तीनही लष्करी दलांचे प्रमुख आणि सरकारमधील वरिष्ठ नेते सहभागी झाले आहेत. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकार पुढील कारवाई ठरवणार आहे. आता पाकिस्तान साळसुदपणाचा आव आणत असला तरी, त्यांचा मागचा इतिहास पहिला तर त्यांचा खोटारडेपणा सहज उघडा पडतो. भारतावर आतापर्यंत जेवेढे दहशतवादी हल्ले झाले त्यातील अनेक हल्यात पाकिस्तानचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे दिसून येते.
भारतावर झालेले अलीकडील प्रमुख दहशतवादी हल्ले, ज्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे आहेत:
2008 – मुंबई 26/11 हल्ला
पाकिस्तानमधून आलेले 10 दहशतवादी समुद्रामार्गे मुंबईत आले.आणि मुंबईच्या ताज हॉटेलवर हल्ला केला ज्यात 170 पेक्षा अधिक लोक मृत पावले. या हल्ल्यात पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबा या संघटनेचा थेट सहभाग होता.
2016 – उरी हल्ला
उरीमधील भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला घडवून आणला होता. भारतानेही त्यानंतर सर्जिकल स्ट्राइक करत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते.
2019 – पुलवामा हल्ला
CRPF च्या जवानांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला करण्यात आला होता यामध्ये आपले 40 जवान शहीद झाले होते. तेंव्हा या हल्याची जबाबदारी पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली होती. त्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करत बालाकोटमधील दहशतवादी तळ उध्वस्त केला होता.
वस्तूतः पाकिस्तानने अनेकदा थेट लष्करी युद्ध, दहशतवादी गटांचा वापर, आणि सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन यांचा वापर करून भारतावर हल्ले केले आहेत. हे हल्ले केवळ सैन्याच्या ठिकाणांवरच नव्हे, तर नागरिकांवर, संसदेमध्ये, तसेच मुंबईसारख्या शहरांमध्येही झाले आहेत. त्यातच आता आता या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ म्हणजे ‘द रेजिस्टन्स फ्रंट’ने घेतली आहे. टीआरएफ हा पाकिस्तानस्थित लश्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा एक चेहरा आहे. म्हणजे या संघटनेचा संबंध पाकिस्तानशी आहे, हे स्पष्ट आहे. असे असतानाही पाकिस्तान पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आमचा हात नसल्याचा दावा करत असेल तर मग भारताने उरी हल्ला आणि पुलवामा हल्याला जसे प्रत्युत्तर दिले होते तसेच प्रत्युत्तर देण्याची आता वेळ आलीये. भारताचे सक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे या भ्याड हल्ल्यालाही जरूर प्रत्युत्तर देतील अशी भावना व्यक्त होत आहे.