निसर्गाच्या कुशीत वसलेल्या, स्वर्गासारख्या पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये घडलेला भीषण दहशतवादी हल्ला देशाला हादरवून गेला. पर्यटनाच्या आनंदासाठी आलेले २६ निरागस जीव, काही क्षणात मृत्यूच्या कवेत सामावले गेले. तर या हल्यात १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली असून सर्व स्तरातून या हल्याचा निषेध करण्यात येत आहे.
या हल्ल्याची जबाबदारी ‘द रेजिस्टन्स फ्रंट’ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. या संघटनेने असा आरोप केला आहे की, हल्ल्यात बळी गेलेल्या पर्यटकांचे भारतीय सुरक्षा यंत्रणांशी कथित संबंध होते. तसेच काश्मीरच्या लोकसंख्येतील बदलांविरोधात या हल्ल्याचा हेतू असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
हल्लेखोरांची ओळख पटली
हल्ल्याच्या तपासात आता एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या दहशतवादी कारवाईत सहभागी असलेल्या चार दहशतवाद्यांपैकी दोन पाकिस्तानी नागरिक होते, तर उर्वरित दोन जण हे काश्मीरमधील स्थानिक होते. यातील दोन दहशतवादी पश्तूर भाषेत बोलत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. या दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव, धर्म विचारून गोळ्या झाडल्याचे समोर आल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. हल्ल्यात बळी गेलेल्या २६ नागरिकांमध्ये २५ भारतीय आणि १ नेपाळी पर्यटकाचा समावेश आहे.
सुरक्षा व्यवस्था कडक, शोधमोहीम सुरू
हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, राष्ट्रीय सुरक्षा दल, जम्मू-काश्मीर पोलीस, आणि CRPFयांच्यामार्फत संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे. दहशतवाद्यांचे संपर्कस्रोत, त्यांची मदत करणारे स्थानिक लोक, आणि वापरण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांबाबत चौकशी सुरू आहे.
भारत-पाकिस्तान संबंधांवर तणाव
या हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान दरम्यानचा तणाव वाढला आहे. भारताने या घटनेचा तीव्र निषेध करत पाकिस्तानवर दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानने हा हल्ला निषेधार्ह असल्याचे म्हटले असले तरी, त्यांचा यामध्ये कोणताही सहभाग नसल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मात्र याआधी भारतात संसदेवर, मुंबईवर झालेल्या हल्याच्या घटना पाहता आणि त्यात पाकिस्तानचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सबंध समोर आलेला असताना संशयाची सुई पाकिस्तानवर आहे.
भारत सरकारची कठोर भूमिका
या प्रकरणानंतर भारत सरकारने देशातील व सीमावर्ती भागातील सर्व संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. तसेच केंद्र सरकारने दहशतवादाविरोधातील कारवाईत आणखी आक्रमक धोरण अवलंबण्याचे संकेत दिले आहेत. तसेच गुप्तचर यंत्रणांना अलर्ट करण्यात आले असून, या हल्ल्यामागील मास्टरमाइंडचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.