Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभर खळबळ उडाली आहे. या भयानक हल्ल्यात २७ नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी आहेत. आता सुरक्षा दल हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. त्यातच एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
गुप्तचर संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्याचे डिजिटल पुरावे पाकिस्तानशी जोडलेले दिसत आहेत. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दावा केला आहे की, हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांच्या डिजिटल पाऊलखुणा पाकिस्तानातील मुझफ्फराबाद आणि कराचीपर्यंत पोहचत आहेत. यावरुन या हल्ल्याचा पाकिस्तानशी संबंध असल्याचा पुरावा मिळत आहे.
घटनास्थळाच्या आजूबाजूल प्रगत श्रेणीतील संवाद साधने सापडली आहेत. यावरून दहशतवाद्यांना बाहेरून रसद आणि सहकार्य मिळत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गुप्तचर यंत्रणांचा दावा आहे की, हल्ला करणारे दहशतवादी थेट पाकिस्तानमध्ये बसलेल्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते.
मात्र, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे की, “या हल्ल्याशी पाकिस्तानचा काही संबंध नाही. आम्ही अशा हल्ल्यांचा निषेध करतो.” पण या वक्तव्यानंतर त्यांनी भारतावरच आरोप करत म्हटले की, “भारतामध्ये लोक सरकारविरोधात आहेत, नागालँड, मणिपूर आणि काश्मीरमध्ये लोक संतप्त आहेत, त्यामुळे अशा घटना घडतात.”त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे, कारण हे वक्तव्य दहशतवाद्यांना पाठीशी घालणारे स्पष्टपणे दिसत आहे.