Sachin Tendulkar: आज मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरचा जन्मदिवस. सचिन तेंडुलकरचा जन्म २४ एप्रिल १९७३ मध्ये मुंबईमध्ये एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला आहे. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. सचिन तेंडूलकरने त्याच्या शारदाश्रम विद्यामंदिर ह्या शाळेतील क्रिकेटचे प्रशिक्षक ‘रमाकांत आचरेकर’ यांच्याकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घ्यायला सुरवात केली होती.
वयाच्या १६ व्या वर्षी, १९८९ मध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात भारतीय संघात पदार्पण केले होते. पहिल्याच सामन्यात त्याने वासिम अक्रम, इम्रान खान, अब्दुल कादीर आणि वकार युनूससारख्या दिग्गज गोलंदाजांचा सामना केला. सचिनची आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सुरुवात निराशाजनक झाली होती. परंतु याच सचिनने पुढे जाऊन क्रिकेट विश्वातील अनेक विक्रम आपल्या नावी केले.
– सचिनने एकदिवसीय सामन्यांमधील त्याचे पहिले शतक ९ सप्टेंबर १९९४ रोजी श्रीलंकेमध्ये येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदवले होते.
– १९९७ मध्ये सचिनला त्या वर्षीचा सर्वोत्तम वार्षिक क्रिकेट खेळाडू घोषित करण्यात आले होते. कारण याच वर्षी सचिनने पहिल्यांदाच १००० कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या.
-सचिनच्या नावावर एका वर्षात १००० धावा करण्याचा विक्रम आहे, हा पराक्रम त्याने १९९४, १९९६, १९९७, १९९८, २०००, २००३ मध्येही पूर्ण केला होता. अर्थातच तब्बल सहावेळा एका वर्षात १००० धावा पूर्ण करणारा तो एकमेव खेळाडू आहे.
-त्याचा कसोटीतील ४९ शतकांचा तर वन -डे मध्ये ५१ शतकाचा विक्रम आजवर कोणताही खेळाडू मोडू शकला नाही.
-२००२ मध्ये, विस्डेन क्रिकेट खेळाडू्सच्या अॅलमॅनॅकने त्याला डॉन ब्रॅडमन आणि व्हिव्ह रिचर्ड्सच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा वनडे फलंदाज म्हणून स्थान दिले होते.
-सचिन तेंडुलकरने एकदिवसीय सामन्यात १८,४२६ धावा केल्या आहेत, जो जागतिक विक्रम गणला जातो.
सचिनने एकदिवसीय सामन्यात ४९ शतके झळकावली आहेत.
-सचिनने तब्बल ९६ वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
-सचिन तेंडूलकरला एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक वेळा म्हणजेच ६२ वेळा सामनावीर पुरस्कार मिळाला आहे.
-एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावणारा सचिन तेंडूलकर पहिला खेळाडू ठरला होता.
-सचिनने ४५ विश्वचषक सामने खेळले आहेत, हा देखील एक महत्वपूर्ण विक्रम मानला जातो.
-१९९८ मध्ये सचिनने एका वर्षात ९ शतके झळकावली होती, त्याचा हा विक्रम आजही कोणताच खेळाडू मोडू शकला नाही.
– एकदिवसीय सामन्यात दहा हजारांपेक्षा जास्त धावा करणारे तो सर्वात जलद खेळाडू आहेत.
-सचिन तेंडूलकर गोलंदाज म्हणून ओळखला जात नसला तरी त्याने वेळ पडल्यावर केलेली गोलंदाजी संघासाठी बऱ्याचदा महत्वपूर्ण ठरली आहे. सचिनची गोलंदाजीची सरासरी ५० च्या वर असली तरी, त्याला ‘जम बसलेली फलंदाजांची जोडी फोडण्याचा हातगुण असणारा गोलंदाज’ म्हणून त्यावेळी ओळखले जात असे. १९९७-९८ सालच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत २६९ धावांचे लक्ष्य समोर असताना ३१ व्या षटकात ऑस्ट्रेलियाची २०३/३ अशी मजबूत स्थिती होती. त्यावेळी सचिनने १० षटकात केवळ ३२ धावा देऊन मायकेल बेव्हन, स्टीव वॉ, डी.एस.लेमन, टॉम मूडी आणि डीन मार्टिन ह्यांना बाद करून सामना भारताच्या बाजूने वळवला होता.
सचिनच्या फलंदाजीची वैशिष्ट्ये:
-सचिनच्या फलंदाजीमध्ये कोणत्याही परिस्थितीत खेळण्याची क्षमता होती. फिरकीपटूंविरुद्ध तेवढेच प्रभावी, वेगवान गोलंदाजांविरुद्ध तेवढेच आत्मविश्वासपूर्ण खेळणे ही त्याच्या फलंदाजीची विशेष वैशिष्ट्ये होती.
-सचिनच्या फलंदाजीतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांचा उत्कृष्ट फुटवर्क. फुटवर्क म्हणजे तो चेंडूची लाईन आणि लेंथ अचूकपणे ओळखत असे आणि त्यानुसार आपले पाय हलवत असत, ज्यामुळे त्याला फटके मारण्यासाठी पुरेसा वेळ मिळत असे.
– सचिन फलंदाजी करताना मनगटाचा अप्रतिम वापर करत असायचा. पुल आणि फ्लिकसारखे फटके तो सहजतेने खेळू शकत होता, ज्यामुळे त्यांच्या फटक्यांना एक खास सौंदर्य प्राप्त झाले होते.
-अनेक वर्षांच्या कारकिर्दीत त्याने फिटनेस आणि सरावावर प्रचंड लक्ष केंद्रित केले होते.
सचिनचा सन्मान:
-2014 मध्ये सचिन तेंडूलकरला भारतरत्न पुरस्कारामे सन्मानित करण्यात आले आहे.
-1994 मध्ये सचिन तेंडुलकरला अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला होता.
-1997 मध्ये सचिन तेंडूलकरला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या निमित्ताने हा पुरस्कार मिळवणारा सचिन तेंडूलकर हे पहिले क्रिकेट खेळाडू ठरले होते.
-1999 मध्ये सचिनला पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
-2001 मध्ये सचिनला महाराष्ट्र भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
-2008 मध्ये त्याला पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
-2010 मध्ये सचिनला एलजी पीपल्स चॉईस अवॉर्ड प्राप्त झाला होता.
-2011 मध्ये क्रिकेट खेळाडू ऑफ द इअर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
सचिन तेंडूलकरचा शेवटचा क्रिकेट सामना:
सचिन तेंडुलकरचा शेवटचा क्रिकेट सामना १६ नोव्हेंबर २०१३ रोजी झाला होता. वेस्ट इंडिजविरुद्ध वानखेडे स्टेडियममध्ये खेळलेला हा कसोटी सामना होता. हा त्याचा २00 वा कसोटी सामनादेखील होता आणि या सामन्यानंतर त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे जाहीर केले होते.
सचिनचा राजकारणात प्रवेश:
सचिन तेंडुलकरची २७ एप्रिल २०१२ रोजी राष्ट्रपतींद्वारे राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यानिमित्ताने तो राज्यसभेचा सदस्य बनणारा पहिला सक्रिय खेळाडू ठरला होता. खासदार म्हणून काम करत असताना त्याने भारतातील खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी विशेष प्रयत्न केले. अर्थातच खासदार म्हणून सचिनने क्रीडा क्षेत्रातील सुधारणा आणि विकासावर लक्ष केंद्रित केले होते.