ठाणे, १४ जानेवारी : आर्टीफिशियल इंटीलिजन्स (ए.आय.) अर्थात कृत्रिम बुद्धीमत्तेत २०१८ मध्ये भारत जगात १८ व्या स्थानी होता तर, २०२३ मध्ये १४ व्या स्थानी आहे.एआयच्या टॅलेंट पुलमध्ये पहिल्या स्थानावर सॅन फ्रान्सिस्को तर दुसऱ्या स्थानी बेंगलोर आहे. भारताची बुद्धीमता कृत्रीम बुद्धिमत्तेच्या पुढे आहे. त्यामुळे जगाची खात्री झाली असुन कृत्रिम बुद्धिमत्तेला भारतात अच्छे दिन आले आहेत, किंबहुना २०२४ ची हीच गॅरंटी आहे.असे प्रतिपादन आर्टीफिशियल इंटीलिजन्स तज्ञ डॉ. भूषण केळकर यांनी केले.
ठाण्यातील सरस्वती शाळेच्या पटांगणात ज्ञान, प्रबोधन आणि मनोरंजन या त्रिसुत्रीवर आधारलेल्या कै.रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत “कृत्रिम बुद्धीमत्ता – भविष्य व्यापणारे तंत्रज्ञान” या विषयावरील चौथे पुष्प डॉ. केळकर यांनी गुंफले. यावेळी सत्राचे अध्यक्ष ज्येष्ठ व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे आणि उपमहापौर अॅड. सुभाष काळे व्यासपीठावर उपस्थित होते. मेहेत्रे यांनी प्रास्तविकात भारतातील इंटरनेटच्या चंचुप्रवेशापासुनचा आढावा घेत, चॅट जीपीटी व आर्टफिशियल इंटीलेजन्सचे किस्से कथन केले.
युवा दिनाचे औचित्य साधत डॉ. भूषण केळकर यांनी, एआय तंत्रज्ञानाचे विश्लेषण आणि संश्लेषण सोदाहरण स्पष्ट केले. कृत्रिम बुद्धीमत्ता ही पाश्चिमात्य देशांसाठी असल्याचे म्हटले जाते.परंतु, ऑगस्ट – सप्टेंबर महिन्यातील अहवालानुसार भारतात टुथब्रशपेक्षा अधिक मोबाईल विक्री झाली आहे. याचाच अर्थ कृत्रिम बुद्धीमत्ता भारतीयांच्या जीवनाचा भाग बनली असुन जीवनमान सुधारण्यासाठी त्याचा कसा उपयोग करता येईल हे पाहावे लागेल, भारताकडे इन्फ्रास्ट्रक्चर उत्तम आहे त्यामुळे जगाची खात्री पटली आहे की, भारतात कृत्रिम बुद्धीमत्तेला चांगले दिवस आले आहेत. तंत्रज्ञानामुळेच जगाच्या बाजारपेठेत भारत अग्रणी असुन हे सर्व ग्रामीण भागात जाण्याची गरज असल्याचे डॉ. केळकर म्हणाले. यासाठी त्यांनी इंडस्ट्री ०.१ ते इंडस्ट्री ०.४ चा आढावा घेऊन सध्या इंडस्ट्री ०.५ सुरु असल्याचे सोदाहरण स्पष्ट केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आपण आपली प्रायव्हसी घालवुन बसलो आहोत.तेव्हा, एआय वर मात करण्यासाठी मानवी बुद्धीमत्ताच लागेल. त्यासाठी विश्लेषणाकडुन संश्लेषणाकडे जायला हवे, भावनांक चांगला हवा, प्रश्न विचारण्याची बुद्धीमत्ता हवी, कुतुहल हवे तरच उत्तर तंत्रज्ञान उत्तर देईल.
तरच शिक्षण क्षेत्रात प्रगती …
शिक्षण क्षेत्रात नुसते तंत्रज्ञान येऊन काय उपयोग ? शिक्षकांनी गुगल प्लस प्लस व्हायला हवे, तर विद्यार्थ्यानी चॅट जीपीटी मायनस मायनस व्हायला हवे. तरच शिक्षण क्षेत्रात प्रगती होईल. असे स्पष्ट करून डॉ. केळकर यांनी, तंत्रज्ञानाचा वेग बायोलॉजिकल स्पीडपेक्षा वाढत आहे. तेव्हा सर्वाना वेग वाढवावा लागेल. कोर्सेस आणि करिक्युलमवर विसंबुन राहण्याचे दिवस संपले असून तंत्रज्ञानात आत्मनिर्भर बनलो नाही तर एआय च्या जगात आपला टिकाव लागणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.