नागपूर, 13 जानेवारी : जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत आहे. कोणत्याही मोठ्या जागतिक मुद्द्यावर भारताशी सल्लामसलत केल्याशिवाय निर्णय होत नाही. जागतिक मुद्यांवर भारताची संमती महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केले. ते शनिवारी नागपुरात एका संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
याप्रसंगी भारत आणि चीन यांच्यातील राजकीय संबंधांवरह भाष्य करताना जयशंकर म्हणाले की, दोन्ही बाजूंनी तयारी दाखवल्याशिवाय सीमाप्रश्नावर तोडगा निघणे शक्य नाही. मी चिनी परराष्ट्र मंत्र्यांना समजावून सांगितले की जोपर्यंत सीमा विवादावर तोडगा निघत नाही आणि तोपर्यंत सैन्य सीमेवर तैनात राहतील. पण यामध्ये तुम्ही बाकीचे संबंध सामान्य राहण्याची अपेक्षा करु शकत नाही. दोन्ही देश संबंध सामान्य करण्यासाठी काम करत आहेत आणि काही वेळा राजकीय अडथळे दूर होण्यास वेळ लागतो असे जयशंकर यांनी सांगितले. भारत आणि चीनमध्ये लष्करी हालचालींबाबतह करार झाले आहेत. परंतु, 2020 मध्ये चीनने त्याचे उल्लंघन केले. कोरोना साथरोगाचा काळ असूनही गलवानमध्ये मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात करण्यात आले होते. तेव्हापासून दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आहेत. भारताने कराराचे उल्लंघन केलेले नाही, परंतु आपल्या सुरक्षेसाठी पुरेशी तैनाती करावी लागेल. चीन आणि भारतात राजकीय पातळीवर मंथन सुरू आहे. अनेक वेळा घाईघाईने उपाय करता येत नाहीत. परिस्थिती सामान्य करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
भारताच्या संयुक्त राष्ट्रातील स्थायी सदस्यत्वावर बोलताना जयशंकर म्हणाले की, भारताला संयुक्त राष्ट्राचे स्थायी सदस्यत्व मिळावे असे जगाला देखील वाटते. यासाठी जगभरातून मिळत असलेला पाठिंबा अनुभवता येतोय. भारत क्वाड आणि ब्रिक्स सारख्या वेगवेगळ्या गटांचा भाग असल्याबाबत जयशंकर म्हणाले की, भारत हा एक स्वतंत्र देश आहे. त्यामुळे वेगवेगळ्या लोकांसोबत वेगवेगळ्या प्रकारे आपले हित कसे जपायचे हे शिकणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.