आज म्हणजेच १५ जानेवारी रोजी भारतीय लष्कर दिन साजरा करण्यात येतो. त्याचनिमित्ताने उत्तर प्रदेशमधील लखनौमध्ये सोमवारी ७६ वा लष्कर दिन मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या समारोहाचे आयोजन मेजर जनरल सलील सेठ यांच्या नेतृत्वाखाली लखनौच्या ११ गोरख रायफल्स रेजिमेंटल सेंटरच्या परेड ग्राउंडमध्ये करण्यात आले होते. यावेळी भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी परेडची पाहणी केली आणि निवडक अधिकारी व जवानांना शौर्य पुरस्कार प्रदान केले. सैन्याच्या विविध रेजिमेंटमधून सहा मार्चिंग तुकड्या, पाच रेजिमेंटल ब्रास बँड आणि तीन पाईप बँडचा समावेश असणारी एक तुकडी सामील झाली होती.
या परेडमध्ये सहा मार्चिंग तुकड्या होत्या. त्यामध्ये ५० वी पॅराशूट ब्रिगेड, शीख लाइट इन्फंट्री, जाट रेजिमेंट, गढवाल रायफल्स, बंगाल इंजिनियर ग्रुप आणि आर्मी एअर डिफेन्स या तुकड्यांचा समावेश होता. पाच रेजिमेंटल ब्रास तसेच सैन्याच्या बँड पथकामध्ये पंजाब रेजिमेंट सेंटर, ग्रेनेडीयर रेजिमेंटल सेंटर, बिहार रेजिमेंट सेंटर, शीख लाईट रेजिमेंट सेंटर, कुमाऊ रेजिमेंटल सेंटर, आणि शीख रेजिमेंटल सेंटरचा समावेश होता. दरम्यान, परेडमध्ये लष्करप्रमुख जनरल पांडे यांनी सैनिकांना संबोधित केले. त्यामध्ये ते म्हणाले, लष्कर कोणत्याही प्रकारच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे तयार असून, सक्षम आहे. तसेच उत्तरेकडील डिमेवर आपली क्षमता अधिक विकसित करण्यासाठी अनेक ठोस पावले उचलण्यात आली आहेत.
जनरल मनोज पांडे सैनिकांना संबोधित करताना म्हणाले, ”याआधी भारतीय लष्कराने सर्व सुरक्षा आव्हानांचा सामना केला आहे. मला अभिमान आहे की, आमच्या प्रत्येक सैनिकाने आपली जबाबदारी पार पाडली आहे. मग ती सीमेची सुरक्षा असो, कठीण भागातील तैनाती असो, किंवा आव्हानात्मक हवामान असो. आमच्या सैन्याने पूर्ण दक्ष राहून घुसखोरीचे प्रयत्न हणून पाडले आहेत. जम्मू-काश्मीरच्या भागात सुरक्षा दलांच्या सततच्या प्रयत्नांमुळे हिंसाचारात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. आम्ही एकत्रितपणे देशातून दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी सर्व संबंधित पक्ष दृढनिश्चयाने काम करत आहोत.”
आज आपला देश एका नव्या युगाच्या उंबरठ्यावर आहे. ते पुढे म्हणाले, ”आपण सर्वानी ‘विकसित भारत’ हे स्वप्न पहिले आहे कारण, आपला देश स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण करत आहे. ज्यासाठी एक सुरक्षित वातावरण आवश्यक हे आणि भारतीय लष्कर ते साध्य करण्यात महत्वाची भूमिका बजावते.” ७६ व्या लष्कर दिनानिमित्त झालेल्या परेडनंतर पॅराट्रूपर्सच्या स्कायडायव्हिंग डिस्प्ले आणि डेअरडेव्हिल जंप, कॉर्प्स ऑफ सिग्नल्स डेअरडेव्हिल टीमने डेअरडेव्हिल मोटरसायकल डिस्प्ले आणि ALH ध्रुव आणि ALH रुद्र हेलिकॉप्टरचा समावेश असलेल्या आर्मी एव्हिएशन कॉर्प्सच्या हेलिकॉप्टरद्वारे फ्लाय-पास्ट करण्यात आला.