मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रायगडमध्ये अलिबाग दौऱ्यावर आहेत. तिथे आयोजित जमीन परिषदेत बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे तसेच रायगड-अलिबागच्या जमिनी कोण लाटतंय? असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला आपल्या जमिनी वाचवण्याचे आणि न विकण्याचे आवाहन केले आहे. आपल्या लोकांना भान राहिलेले नाही. माथेरान, नेरळ येथे बघा कोण घरे घेत आहेत. मराठी लोक संपत चालले आहेत. देशावर राज्य करणाऱ्या मराठा लोकांच्या जमिनी विकत घेतल्या जात आहेत. तुमच्या हक्काची जमीन नसेल तर तुम्ही कुठलेच नागरिक राहणार नाहीत, त्यामुळे जमिनी विकू नका, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
बाहेरून येणारी लोकसंख्या आपल्या राज्यात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बाहेरचे येऊन तुमच्या जमिनी घेऊन तुम्हाला पोरके करत आहेत. तुमच्या हातात योग्य मोबदला देत नाहीत. तुम्हाला पोखरत आहेत.त्यामुळे वेळीच सावध व्हा ,आपण आपल्या पायावर दगड मारुन घेऊ नका. पुढील चार-पाच वर्षात परिस्थिती हातून निघून जाईल असे आवाहन राज ठाकरे यांनी जनतेला केले आहे.
याचबरोबर मनसेच्या कार्यकर्त्यांची कानउघाडणी करत त्यांना मराठी भाषेबद्दल सतर्क राहण्यास बजावले आहे.