अनेक दशके जागतिक क्रिकेटवर राज्य करणारा महान फलंदाज सचिन तेंडुलकर सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. कारण सचिन तेंडुलकर हा डीपफेकचा बळी ठरला आहे. सध्या सचिनचा एक डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सचिन तेंडुलकर डीपफेकचा बळी ठरला असून त्याने याबद्दल सर्वांना सतर्क केले आहे. सचिनने X वर आपल्या अधिकृत अकाऊंटवरून तो व्हिडिओ शेअर करताना सांगितले की, व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ खोटा आहे. हा व्हिडिओ बनावट असून तुम्हाला फसवण्यासाठी बनवला आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर करण्याचा हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे. आपणा सर्वांना विनंती आहे की असे व्हिडिओ किंवा अॅप्स किंवा जाहिराती दिसल्यास त्वरित तक्रार करा.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने देखील सावधगिरी बाळगली पाहिजे आणि त्यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारींवर लवकरात लवकर कारवाई करावी. चुकीची माहिती आणि बातम्यांना आळा बसावा आणि डीपफेकचा गैरवापर थांबवता यावा यासाठी त्यांची भूमिका या बाबतीत खूप महत्त्वाची आहे, असेही सचिन तेंडुलकरने म्हटले आहे.
गेल्या काही महिन्यांत अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये अभिनेत्री रश्मिका मंदाना, कतरिना कैफ, आलिया भट्ट या अभिनेत्री डीपफेक व्हिडीओच्या बळी ठरल्या आहेत. तर आता सचिन तेंडुलकरचाही एक डिपफेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो एका अॅपचे प्रमोशन करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये एआयच्या मदतीने सचिन तेंडुलकरचा आवाज डब करून एक बनावट व्हिडिओ बनवण्यात आला आहे.
https://twitter.com/sachin_rt/status/1746794062961950824
या व्हिडीओमध्ये सचिन तेंडुलकर एका ऑनलाईन गेमिंग अॅपच्या प्रमोशनबाबतची माहिती देताना दिसत आहे. यावेळी त्याने मुलगी साराचाही उल्लेख केला आहे. “माझी मुलीगीही यावेळी ही गेम खेळतीये, ज्याबाबत प्रत्येकजण सध्या बोलत आहे. ती हा गेम खेळून दररोज एक लाख 80 हजार रूपये कमावते. त्यामुळे मला कधीकधी आश्चर्य वाटते की हल्ली पैसा कमावणे किती सोप्पे झाले आहे. सगळ्यात विशेष म्हणजे हे अॅप अगदी मोफत आहे. त्यामुळे ते कुणीही डाऊनलोड करू शकतो, अशी वाक्ये व्हिडीओमध्ये सचिनच्या तोंडी टाकण्यात आली आहेत.