पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी पलासमुद्रम येथे राष्ट्रीय सीमा शुल्क, अप्रत्यक्ष कर आणि अंमली पदार्थांच्या राष्ट्रीय अकादमीच्या नवीन कॅम्पसचे उदघाटन करणार आहेत. तसेच मोदी केरळमधील कोची येथे भव्य असा रोड शो देखील करणार आहेत. पंतप्रधान भारतीय महसूल सेवे (सीमा शुल्क व अप्रत्यक्ष कर) च्या ७४ व्या आणि ७५ व्या तुकडीच्या अधिकारी, प्रशिक्षणार्थी तसेच भुतांच्या रॉयल सिव्हिल सर्व्हिसच्या प्रशिक्षणार्थींशी संवाद साधणार आहेत.
दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास, पंतप्रधान नरेंद्र मोदी वीरभद्र मंदिर, लेपाक्षी आंध्र प्रदेश येथे पूजा करणार आहेत. तसेच दुपारी साडेतीन वाजता पंतप्रधान श्री सत्य साई जिल्ह्यातील पलाससमुद्रम येथे जाणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी सव्वा सात वाजता केरळच्या कोचीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी भव्य रोड शो करणार आहेत. १७ जानेवारी म्हणजे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमधील गुरुवायूर मंदिरात पूजा करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १०.३० च्या सुमारास श्री रामास्वामी मंदिरात पूजा आणि दर्शन करतील. त्यानंतर दुपारच्या सुमारास पंतप्रधान बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करतील”, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. अवघ्या दोन आठवड्यांच्या कालावधीत पंतप्रधान दुसऱ्यांदा केरळ दौऱ्यावर जाणार आहेत.