डेहराडून: जसजसा प्राण प्रतिष्ठा समारंभाचा दिवस जवळ येत आहे तसतशी भक्तांची उत्सुकता वाढत आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मंगळवारी सांगितले की, भक्तांची 500 वर्षांची प्रतीक्षा आता संपणार आहे. तसेच मुख्यमंत्री धामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुकही केले. मोदींच्या नेतृत्वाखाली आज हे भव्य राम मंदिर प्रत्यक्षात येत असल्याचे, धामींनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी एएनआयला सांगितले की, 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी उत्तराखंडमध्ये सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. 500 वर्षांहून अधिक काळापासून ज्या क्षणाची वाट पाहिली जात होती तो क्षण आता आपल्या आयुष्यात येणार आहे. पंतप्रधानांचे आभार कारण त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या प्रभावी आणि तत्पर कार्यशैलीमुळे देशभरातील लोकांना आणि प्रभू रामाच्या सर्व भक्तांना हा क्षण पाहायला मिळत आहे. या सुंदर क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
“उत्तराखंडमध्ये सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. आपली सर्व धार्मिक स्थळे, घाट, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक मोहीम राबवून स्वच्छता केली जात आहे,” असेही धामी यांनी सांगितले.
दरम्यान, मंदिरांच्या साफसफाई बाबतच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी लखनौमधील हनुमान मंदिराची स्वच्छता केली. लष्कर दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते लखनौमध्ये होते. राजनाथ सिंह सकाळी लखनौ विद्यापीठाजवळील हनुमान सेतू मंदिरात पोहोचले, तेथे त्यांनी झाडू मारून साफसफाई केली. त्यानंतर त्यांनी हनुमानाचे दर्शन घेतले.
याबाबतची एक पोस्ट राजनाथ सिंह यांनी x वर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना त्यांच्या सभोवतालच्या मंदिरांमध्ये स्वच्छतेसाठी योगदान देण्याचे आवाहन केले आहे. आज मी लखनौ येथील हनुमान सेतू मंदिरात जाऊन स्वच्छ तीर्थ मोहिमेअंतर्गत स्वच्छता केली आणि हनुमानजींची सेवा करण्याचा बहुमान मला मिळाला.”
राजनाथ सिंह यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही मंगळवारी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिराच्या परिसराची स्वच्छता केली. याबाबत अनुराग ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “पंतप्रधान मोदींनी देशभरातील मंदिरे स्वच्छ करण्याचे सर्वांना आवाहन केले आहे. मीही या मोहिमेत सहभागी झालो होतो. त्यामुळे मला नागरिकांना सांगायचे आहे की, धार्मिक स्थळी स्वच्छता राखण्यापेक्षा दुसरी कोणतीही मोठी भक्ती नाही.”