येत्या २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीराम
अयोध्येतील आपल्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. २२ तारखेला रामलल्लाची
प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली
आहे. देशभरामध्ये राम भक्तांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या दरम्यान, भाजपा नेत्या व
अभिनेत्री हेमा मालिनी या अयोध्येमध्ये एक खास परफॉर्मन्स सादर करणार आहेत.
रामायणावरील एक नृत्यनाटिका हेमा मालिनी सादर करणार आहेत. ‘एक्स‘ वर एक व्हिडीओ शेअर करत हेमा मालिनी यांनी या संदर्भात माहिती दिली
आहे.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान, हेमा मालिनी या
रामायणावर नृत्यनाटिका सादर करणार आहेत. त्यामुळे हेमा मालिनी यांचे सादरीकरण
पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. एक्स वर शेअर
केलेल्या व्हिडिओमध्ये हेमा मालिनी म्हणाल्या, ”जय श्रीराम. मी पहिल्यांदा अयोध्येला येत आहे. ते अशा वेळी, जेव्हा रामलल्लाच्या मंदिराचे उदघाटन
होणार आहे. ज्याची गेली कित्येक वर्षे लोकांना प्रतीक्षा होती. १४ ते २२ जानेवारी
दरम्यान, जगद्गुरू
पद्मविभूषण तुलसी पिठाधीश्वर रामानंद स्वामी राम रामभद्राचार्य यांचा ७५ वा जन्मदिन साजरा केला जाणार आहे. त्याच वेळी
मी माझ्या पूर्ण टीमसह मंदिराचे उदघाटन आणि श्री गुरुदेव यांच्या जन्मदिनाचे
औचित्य साधत अयोध्यामध्ये १७ जानेवारीला संध्याकाळी ७ वाजता रामायणावर आधारित एक
नृत्यनाटिका सादर करणार आहोत. नृत्यनाटिका पाहण्यासाठी सर्वानी अयोध्येत यावे.”
अयोध्येतील राम मंदिराची प्रतीक्षा तब्बल ५०० वर्षानंतर संपणार आहे.
यामुळे देशामध्ये आनंदाचे, जल्लोषाचे
वातावरण आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.