येत्या २२ जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली
जाणार आहे. प्रभू श्रीराम आपल्या भव्य मंदिरामध्ये विराजमान होणार आहेत. देशभरात
जल्लोषाचे, आनंदाचे
वातावरण बघायला मिळत आहे. दरम्यान,
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिरावरून संघ
आणि भाजपावर निशाणा साधला आहे.
अयोध्येचा जय श्रीराम,
हनुमान याबद्दल आम्हाला आदर आहे. अयोध्येमध्ये मशीद पडल्यानंतर मंदिर
बांधण्याचा निर्णय राजीव गांधी यांच्या काळात झाला. त्यांच्या हस्तेच मंदिराचा
शिलान्यास झाला होता. सध्या संघ आणि भाजप राजकारणासाठी राम मंदिराचा वापर करत
असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. शरद पवार निपाणी येथील कार्यक्रमात बोलत होते.
राजकारणासाठी धार्मिकतेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहा दिवस उपवास करणार आहेत. त्यांच्या भावनांचा मी
आदर करतो. मात्र देशातील गरिबी
हटविण्यासाठी त्यांनी काही केले असते तर बरे झाले असते असा, टोला शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना
लगावला.