नुकत्याच झालेल्या तैवानच्या अध्यक्षीय निवडणुकीत, पूर्वी ताइनानचे महापौर म्हणून काम केलेल्या लाइ चिंग-ते यांना 5 दशलक्ष मते मिळाली. यानिमित्ताने तैवान आणि चीन यांच्यातील चांगल्या संबंधांचे समर्थन करणारे, तिबेटचे अध्यात्मिक नेते दलाई लामा यांनी तैवानचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते यांना पत्र लिहून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तर राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते यांचे अभिनंदन केल्याबद्दल तैवानचे माजी अध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी दलाई लामा यांचे आभार मानले आहेत.
“जगभरातील स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेसाठी तैवानमधील लोकशाहीच्या आमच्या सरावाचे महत्त्व ओळखण्यासाठी दलाई लामा यांच्या अभिनंदन आणि प्रेरणादायी संदेशाबद्दल कृतज्ञ,” अशी पोस्ट त्साई यांनी X वर केली आहे.
दलाई लामा यांनी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते यांचे अभिनंदन करण्यासाठी पत्र लिहिले होते. त्यांनी या पत्रात लिहिले आहे की, “खरोखर, तैवानमध्ये नुकत्याच घडलेल्या लोकशाहीच्या सरावाचे निरीक्षण करणे तसेच स्वातंत्र्य आणि सन्मानाने जगण्याची आकांक्षा बाळगणे हे आपल्या सर्वांना प्रोत्साहन देणारे आहे.”
“माझ्या तैवानच्या भेटीदरम्यान लोकांनी दाखवलेले आदरातिथ्य मला आठवते. तेव्हा मी तिथे लोकशाही किती घट्टपणे रुजली आहे हे देखील पाहिले. तैवानच्या लोकांनी फक्त समृद्ध, मजबूत लोकशाहीच विकसित केली नाही, तर आर्थिक आणि शिक्षणाच्या बाबतीतही बरेच काही साध्य केले आहे. तसेच त्यांनी आपली समृद्ध पारंपारिक संस्कृती जपली आहे” असे दलाई लामा यांनी म्हटले आहे.
पुढे त्यांनी म्हटले की, “तैवानच्या बौद्ध लोकांच्या बौद्ध धर्माप्रती असलेल्या तीव्र भक्तीची मी प्रशंसा करतो. एक बौद्ध भिक्षू या नात्याने, मी वेळोवेळी त्यांच्या शिकवणी आणि आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी केलेल्या विनंत्या पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो.”
“तैवान आणि पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना यांच्यातील चांगले संबंध अत्यंत महत्त्वाचे आहेत. स्थानिक, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर असो, कठीण समस्या सोडवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे संवाद होय आणि यावर माझा दीर्घकालीन विश्वास आहे”, असेही दलाई लामा म्हणाले.
तसेच तैवानच्या लोकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी समोर असलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी दलाई लामा यांनी लाइ यांना प्रत्येक यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, तैवानच्या राष्ट्राध्यक्षापदी निवड झाल्यानंतर लाइ चिंग-टे यांनी सांगितले की, “मी आपल्या देशाचे चीनकडून येणाऱ्या सततच्या धमक्यांपासून संरक्षण करण्यासाठी काम करणार आहे. तसेच मी आमच्या लोकशाही आणि मुक्त संवैधानिक व्यवस्थेनुसार संतुलित आणि क्रॉस-स्ट्रेट (दोन भिन्न देश) स्थिती कायम ठेवेल अशा पद्धतीने कार्य करेन.”
“आम्ही तैवानला जगाच्या नकाशावर ठेवण्यात यशस्वी झालो. तसेच या निवडणुकीने तैवानच्या लोकांची लोकशाहीशी असलेली बांधिलकी जगाला दाखवली आहे, जी मला आशा आहे की चीनही समजू शकेल”, असेही लाइ चिंग-ते म्हणाले.