आज 16 जानेवारी, आजच्या दिवशी महाराष्ट्रातील एक महान समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ आणि न्यायाधीश असलेल्या श्री. महादेव गोविंद रानडे यांची पुण्यतिथी. तर आपण सगळेजण त्यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊयात.
श्री महादेव गोविंद रानडे यांचा जन्म 18 जानेवारी 1842 साली नाशिक मधील ‘निफाड ‘ या गावी झाला. यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात झाले असून पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला आले. आणि तेथील एलफिस्टन हायस्कूलमध्ये दाखल झाले. जेथे त्यांचे इंग्रजी आणि संस्कृत या भाषांमधील वाचन वाढले. त्यांनी लॅटिनचाही अभ्यास केला. मॅट्रिकच्या परीक्षेसाठी त्यांनी ‘मराठेशाहीचा उदय आणि उत्कर्ष’ या विषयावर निबंध लिहिला. पुढच्या काळात त्यांनी याच नावाचे पुस्तकही लिहिले.तीव्र स्मरणशक्ती सामाजिक भान आणि प्रगल्भ बुद्धी असल्याने त्यांना अनेक शिष्यवृत्ती मिळत असत. इतिहास आणि अर्थशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय असून त्यांनी अध्यापन, परीक्षण , अनुवाद आणि न्यायदान अशा कामांमध्येही स्वतःला सिद्ध केले. इतिहास विषय घेऊन त्यांनी एम. ए. केले.
1866 साली ते कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो म्हणून त्यांची निवड झाली. त्यांना न्यायमूर्ती रानडे या नावाने देखील संबोधले जाते. इ .स . 1893 साली मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. ज्ञान प्रसारक सभा, परमहंस सभा, प्रार्थना समाज, सार्वजनिक सभा, भारतीय परिषद इत्यादी विविध संस्था स्थापन करण्यात व त्यांचा विस्तार करण्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता. त्यांना भारतीय उदारमतवादाचे उद्गाते असेही म्हणले जाते. विष्णुबुवा ब्रह्मचारी ,करसनदास मुलजी, भाऊ दाणी, रावसाहेब मंडलिक, विष्णुशास्त्री पंडित, सार्वजनिक काका आणि पंडिता रमाबाई यांच्या बरोबरीने आणि सहकार्याने त्यांनी विधवा पुनर्विवाहाचा प्रश्न, संमती वयाचा कायदा यांसारख्या अनेक समाजसुधारणाकरिता अथक प्रयत्न केले.
1873 मध्ये त्यांच्या पहिल्या पत्नीचे आजारपणामुळे निधन झाले. ते विधवा पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते असल्याने, ते विधवेशीच विवाह करतील ,असे त्यांच्या वडिलांचे ठाम मत होते. म्हणून त्यांच्या वडिलांनी त्याच साली त्यांचा विवाह अण्णासाहेब कुर्लेकर यांच्या कन्येशी लावला. त्यांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नावही रमाच ठेवले. पण आपण विधवेशी लग्न करू शकलो नाही याची खंत त्यांच्या मनात राहिली. त्यांनी त्यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांना पुढे खूप शिकवले. न्यायमूर्ती रानडे यांचे 16 जानेवारी 1901 च्या रात्री नैसर्गिक निधन झाले.
सायली भिडे, कात्रज भाग
सौजन्य – समिती संवाद,पश्चिम महाराष्ट्र प्रांत