येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचा अभिषेक सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे सध्या या सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. तसेच या खास सोहळ्यामुळे फक्त देशातच नाही तर जगभरात उत्साहाचे वातावरण आहे. तर 22 जानेवारीला होणारा प्राणप्रतिष्ठा सोहळा 16 जानेवारीपासून म्हणजेच कालपासून सुरू झाला आहे. पाच दिवस चालणाऱ्या या विधीचा आज दुसरा दिवस आहे. तसेच आज (17 जानेवारी) रामलल्ला पहिल्यांदा मंदिरात प्रवेश करणार आहेत.
आज प्रार्थना आणि मंत्रोच्चारांसह रामलल्ला मंदिरात प्रवेश करणार आहेत. तर उद्या म्हणजेच 18 जानेवारीला ते गर्भगृहात प्रवेश करतील. त्यामुळे आता मंदिर परिसरात प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी यज्ञ व हवन सुरू होणार आहे. 22 जानेवारीपर्यंत हे विधी चालणार आहेत.
तसेच आज रामलल्लाच्या मूर्तीची यात्रा काढण्यात येणार आहे. तर 18 जानेवारीपासून अभिषेकाचा मुख्य कार्यक्रम सुरू होणार आहे. 19 जानेवारी रोजी अग्निकुंडाची स्थापना करण्यात येणार असून यादरम्यान विशिष्ठ पद्धतीने अग्नी प्रज्वलित करण्यात येणार आहे. यासोबत 20 जानेवारीला 81 कलश आणि विविध नद्यांच्या पाण्याने गर्भगृहाला अभिषेक करण्यात येणार आहे. 21 जानेवारी रोजी रामलल्लाला 125 कलशांसह दिव्य स्नान दिले जाईल. त्याचबरोबर 22 जानेवारीला राममंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे.
दरम्यान, या खास सोहळ्याच्यानिमित्ताने अयोध्येत पर्यटकांची मोठी गर्दी होण्यास सुरूवात झाली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून रामभक्त अयोध्येत दाखल होत आहेत.