राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे . काही दिवसांपूर्वीच त्यांनी प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त विधान करुन सगळ्यांचा रोष ओढवून घेतला होता. आता पुन्हा बाबासाहेबांबद्दल एक विचित्र विधान त्यांनी केले आहे.
जितेंद्र आव्हाड आणि वादग्रस्त विधाने हे समीकरण तसे जुनेच आहे. “माहीत नाही, मी हे बोलावे की नाही.. कारण उगाच वाद निर्माण होईल. मात्र तरीही बोलतो” असे म्हणत आव्हाडांनी पुन्हा एकदा राष्ट्रपुरुषांवर टीका करत नव्या वादाला कारण दिले आहे.
नागपूरमध्ये आयोजित केलेल्या सामाजिक परिषदेत ते बोलत होते. बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत की, ”न्यायव्यवस्थेत आरक्षण असायला पाहिजे ते न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन बाबासाहेबांनी ८० टक्के समाजावर अन्याय केला आहे. काही निर्णय असे येतात की, त्यात जातीयवादाचा वास यायला लागतो . खरे तर न्यायपालिकेतून असे मुळीच अपेक्षित नाही. न्यायपालिका निष्पक्ष राहिली पाहिजे अशी राज्यघटनेची अपेक्षा आहे.” मात्र, असे का असा सवाल आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला आहे..
मागे त्यांनी प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते, असे म्हणत गदारोळ उठवून दिला होता.त्यानंतरभाजप कार्यकर्ते आक्रमक झालेच होते पण त्यांच्याच पक्षातून रोहित पवार यांनीही आव्हाडांच्या विधानाचा समाचार घेतला होता. राज्यभरातून त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. नंतर मात्र आव्हाडांनी त्या वादावर पडदा टाकला होता.
आता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आव्हाडांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फुटले आहे.