नवी दिल्ली : सध्या संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. कारण येत्या 22 जानेवारीला रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला फक्त पाच दिवस राहिले असल्यामुळे अयोध्येत जोरात तयारी सुरू आहे. यापार्श्वभूमीवर आज (17 जानेवारी) केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अयोध्या ते बेंगळुरू आणि अयोध्या ते कोलकाता दरम्यानच्या पहिल्या एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइटचे उद्घाटन केले आहे.
लखनौ येथे असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोलकाता ते अयोध्या दरम्यानच्या पहिल्या विमानाचा बोर्डिंग पास मिळाला आहे.
उद्घाटन कार्यक्रमात बोलताना केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशचा विकास नवीन उंचीवर पोहोचत आहे. जर आपण उत्तर प्रदेशची लोकसंख्या पाहिली तर, अमेरिकेच्या लोकसंख्येपैकी जवळपास 70 टक्के लोकसंख्या उत्तर प्रदेशात आहे. युरोपातील निम्मी लोकसंख्या उत्तर प्रदेशात आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये आम्ही दिवाळी साजरी केली. तर दुसरी दिवाळी 3 डिसेंबर रोजी होती जेव्हा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले होते आणि संपूर्ण देशासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी तिसरी दिवाळी येत्या 22 तारखेला साजरी केली जाणार आहे.
तर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन कार्यक्रमात सामील झालेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, “गेल्या नऊ वर्षांत, उत्तर प्रदेशमध्ये केवळ नवीन विमानतळच आले नाहीत तर 4 आंतरराष्ट्रीय विमानतळांसह, उत्तर प्रदेश हवाई कनेक्टिव्हिटीच्या क्षेत्रात एक महत्त्वाचे राज्य बनले आहे. पंतप्रधान मोदींनी 30 डिसेंबर रोजी अयोध्येतील महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले होते.
दरम्यान, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये उत्तर प्रदेश सरकारसोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार भारतीय विमानतळ प्राधिकरणाने अयोध्या विमानतळाच्या विकासाचे काम हाती घेतले होते. त्यानंतर 1450 कोटींहून अधिक खर्च करून अत्याधुनिक विमानतळ विकसित करण्यात आले आहे. या विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ 6,500 चौरस मीटर आहे आणि दरवर्षी सुमारे 10 लाख प्रवाशांना सेवा देण्यासाठी सुसज्ज आहे.