येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. तसेच रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. संपूर्ण देशामध्ये आनंदाचे वातावरण आहे. सर्व रामभक्तांचे स्वप्न अखेर पूर्ण होत आहे. या सोहळ्यासाठी अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याचनिमित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आठवण शेअर केली आहे. याबाबत त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.
अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत गायिका लता मंगेशकर यांची आठवण काढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता दीदी यांचा एक श्लोक एक्स वर शेअर केला आहे. हा श्लोक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी लता मंगेशकर यांच्या आठवणीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, ”ज्या प्रमाणे संपूर्ण देश २२ जानेवारीची वाट पाहत आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जय व्यक्तीची उणीव भासत आहे ती म्हणजे आपल्या लाडक्या लता दीदी. त्यांनी गायलेला शेवटचा श्लोक मी शेअर करत आहे. हा लता दीदी यांनी गायलेला शेवटचा श्लोक असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.”
दरम्यान, राम मंदिराच्या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. या सोहळ्याला राजकीय, खेळ, अभिनय, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये रजनीकांत, अनुष्का शर्मा, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.