राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मला आणि माझी लेक प्रणितीताई शिंदेंना भाजपची ऑफर आली आहे, असा दावा सुशीलकुमार शिंदेंनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
अक्कलकोट तालुक्यातील बोरोट गावामध्ये हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुशीलकुमार शिंदे यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, माझा निवडणुकांमध्ये दोन वेळा पराभव झाला आहे. अशातच आता मला आणि प्रणिती यांना भाजपमध्ये या, अशी ऑफर आली आहे. पण आता ते कसे शक्य आहे? आम्ही ज्या कुशीवर वाढलो, जिथे आमचे बालपण आणि तारूण्य गेले त्याला कसे विसरायचे?
मी आता 83 वर्षांचा आहे. त्यामुळे आता मी भाजपचे म्हणणे बरोबर आहे असे कसे म्हणणार? तसेच तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की, प्रणिती या पक्षीय बदलाच्या भानगडीत पडणार नाहीत, असेही सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, राजकारणात हार-जीत होत राहते. पंडित जवाहरलाल नेहरूंसोबत असेच झाले होते. त्यांचा देखील पराभव झाला होता. त्या पराभवावर पंडित नेहरू म्हणाले होते की, सुरूवातीला लहान मुलाला आधार देऊन चालवावे लागते. नंतर तो त्याचा स्वत: चालतो. चालताना तो पडतो आणि पुन्हा उठतो. मग तो नीट चालायला लागतो आणि जेव्हा चालायला लागतो तेव्हा तो पुन्हा कधी पडत नाही. हे उदाहरण एवढ्याचसाठी आहे की, माणसाला त्रास होतो पण त्याला पुन्हा शक्ती देखील मिळते, असेही सुशीलकुमार शिंदेंनी सांगितले.