कोची : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केरळच्या कोचीमध्ये 4000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या तीन प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) येथील न्यू ड्राय डॉक (NDD), CSL ची आंतरराष्ट्रीय जहाज दुरुस्ती सुविधा (ISRF) आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे पुथुव्यपीन, कोची येथे एलपीजी आयात टर्मिनल यांचा समावेश होता.
कोचीमध्ये पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी शेकडो लोकांनी मैदानावर गर्दी केली होती. तर उद्घाटनानंतर कोची येथील एका मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी त्यांचे भव्य स्वागत केल्याबद्दल केरळच्या लोकांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली. “कोचीला आल्यावर आनंदी चेहरे पाहून मला खूप आनंद झाला. माझ्या भव्य स्वागताबद्दल तुमचे धन्यवाद. तसेच त्रिशूरच्या गुरुवायूर मंदिरात प्रार्थना करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “कोची हे देशाचे पुढील जहाज बांधणी केंद्र बनणार आहे. आम्ही बंदरांची क्षमता वाढवण्यासाठी, बंदरांच्या पायाभूत सुविधा निर्माण आणि मजबूत करण्यासाठी आणि सागरमाला परियोजनासारख्या उपक्रमांद्वारे बंदरांची जोडणी वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आज जेव्हा भारत जागतिक व्यापाराचे केंद्र बनत आहे, तेव्हा आम्ही आमची सागरी शक्ती वाढवत आहोत. लवकरच कोची हे त्याचे प्रतीक बनताना दिसेल,” असेही पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले.
“या 3 प्रकल्पांमुळे देशाच्या जहाजबांधणी आणि दुरुस्ती क्षमतेला, तसेच सहायक उद्योगांसह ऊर्जा पायाभूत सुविधांच्या वाढीला चालना मिळणार आहे. तसेच अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायाच्या संधी निर्माण होतील. त्यामुळे मी केरळच्या लोकांचे अभिनंदन करतो”, असेही मोदी म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी गुरूवायूर मंदिरात तूप आणि कमळाची फुले अर्पण करत प्रार्थना केली. गुरुवायुर देवस्वोम हे भगवान गुरुवायुरप्पन यांना समर्पित मंदिर आहे आणि हिंदूंसाठी सर्वात महत्वाचे पूजास्थानांपैकी एक आहे.