येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण जगभरात उत्साहाचे वातावरण आहे. तसेच या खास सोहळ्यानिमित्त अयोध्येत देशभरातून भाविक येत आहेत. भाविकांची ही गर्दी लक्षात घेता उत्तर प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
भाविकांची गर्दी पाहता उत्तर प्रदेश सरकार लवकरच हेलिकॉप्टर सेवा सुरू करणार आहे. हेलिकॉप्टरची ही सेवा 6 जिल्ह्यांतून अयोध्येपर्यंत सुरू करण्याच्या तयारीत सरकार आहे. तसेच ही सेवा जानेवारीच्या अखेरीस सुरू होईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. तसेच ही हेलिकॉप्टर सेवा पर्यटन विभागामार्फत चालवली जाणार आहे.
हेलिकॉप्टर सेवेच्या माध्यमातून अयोध्येत येणाऱ्या भाविकांना शहरासह राम मंदिराचे हवाई दर्शन घेण्याचीही संधी मिळणार आहे. तसेच राम मंदिर, हनुमानगढी आणि सरयू घाट या प्रमुख पर्यटन स्थळांकडे हेलिकॉप्टरमधून नेण्यात येणार आहे. सध्या ही सेवा उत्तर प्रदेशातील गोरखपूर, वाराणसी, लखनौ, प्रयागराज, मथुरा आणि आग्रा या सहा जिल्ह्यांतून सुरू केली जाऊ शकते.
तुम्हाला हेलिकॉप्टरने राम मंदिर, हनुमानगढ़ी आणि सरयू घाट या प्रतिष्ठित ठिकाणी जाण्यासाठी 15 मिनिटांसाठी प्रति व्यक्ती 3,539 रुपये मोजावे लागतील. एका हवाई प्रवासात 5 पर्यंत भाविक सहभागी होऊ शकतात. तसेच हेलिकॉप्टरने प्रवास करणारे प्रवासी त्यांच्यासोबत जास्तीत जास्त 5 किलो सामान ठेवू शकतात.