नवी दिल्ली : सध्या संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. कारण येत्या 22 जानेवारीला रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला फक्त पाच दिवस राहिले असल्यामुळे अयोध्येत जोरात तयारी सुरू आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (18 जानेवारी) अयोध्येच्या राम मंदिरावरील स्मरणार्थ टपाल तिकिटे आणि जगभरातील प्रभू रामावर जारी केलेल्या टपाल तिकिटांच्या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. या तिकिटांवर आपल्याला राम मंदिर, चौपई (श्लोक) ‘मंगल भवन अमंगल हरी’, सूर्य, शरयू नदी आणि मंदिराच्या आसपासची शिल्पे पाहायला मिळतात.
आज प्रसिद्ध झालेल्या सहा स्मरणार्थ तिकीटांमध्ये अयोध्येतील राम मंदिर, भगवान गणेश, भगवान हनुमान, जटायू, केवलराज आणि मा शबरी यांच्या प्रतिमा आहेत.
हे टपाल तिकिट पुस्तक भगवान रामाच्या आंतरराष्ट्रीय लोकप्रियतेवर प्रकाश टाकते. तसेच या 48 पानांच्या पुस्तकात यूएस, न्यूझीलंड, सिंगापूर, कॅनडा, कंबोडिया आणि संयुक्त राष्ट्र सारख्या संस्थांसह 20 हून अधिक देशांनी जारी केलेल्या तिकिटांचा समावेश आहे.
याबाबत पंतप्रधान मोदींनी X वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, नमस्कार, आज मला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा अभियानाशी संबंधित कार्यक्रमात सहभागी होण्याचे सौभाग्य मिळाले आहे. तसेच आज राम मंदिराला समर्पित 6 विशेष स्मरणार्थ टपाल तिकिटे जारी करण्यात आली आहेत. जगातील विविध देशांमध्ये रामाशी संबंधित टपाल तिकिटे जारी करण्यात आली आहेत. मी सर्व राम भक्तांचे अभिनंदन करतो. पोस्टल स्टॅम्पचे एक कार्य म्हणजे ते लिफाफ्यावर ठेवणे, त्यांच्या मदतीने पत्र, संदेश किंवा महत्त्वाचे कागदपत्रे पाठवणे. पण ही टपाल तिकिटे एक अनोखी भूमिका बजावतात.
https://twitter.com/ANI/status/1747869112230133846
ही टपाल तिकिटे विचार, इतिहास आणि ऐतिहासिक प्रसंग पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे. हा केवळ कागदाचा तुकडा नाही. ते इतिहासाच्या पुस्तकांमधील आकृत्या आणि ऐतिहासिक क्षणांच्या लहान आवृत्त्या देखील आहेत. तरुण पिढीलाही त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.