अयोध्येत २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी भव्य राम मंदिराचे लोकार्पण करणार आहेत. तसेच रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना देखील केली जाणार आहे. हा अद्भुत सोहळा सर्वाना पाहता यावा यासाठी शिंदे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे सरकारने २२ जानेवारी रोजी राज्यात शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. हा सोहळा याची देहा, याची डोळा पाहण्यासाठी अनेकजण आधीच अयोध्येत पोहोचले आहेत. दरम्यान, या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्यामुळे नागरिकांना हा अद्भुत सोहळ्याचे साक्षीदार होता येणार आहे.
यापूर्वी अनेक राज्यांनी २२ जानेवारी निमित्त शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. महाराष्ट्रामध्ये देखील शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी होत होती. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीला हिरवा कंदील दाखवला असून राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारने देखील पत्रक काढत केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. केंद्र सरकारने २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या सोहळ्यानिमित्त देशातील केंद्र सरकारची कार्यालये, केंद्रीय संस्था , केंद्रीय औद्योगिक संस्था दुपारी २.३० वाजेपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, राम मंदिराच्या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. या सोहळ्याला राजकीय, खेळ, अभिनय, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये रजनीकांत, अनुष्का शर्मा, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.