अवघा देश राममय झाला आहे. कारण येत्या २२ तारखेला म्हणजेच अवघ्या दोन दिवसांनी अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम आपल्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाळ दास यांच्यसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच या सोहळ्यामध्ये राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, अभिनय, उद्योगपती अशा क्षेत्रांमधील लोक उपस्थित राहणार आहेत. आज आपण राम मंदिरामध्ये आपल्याला दर्शन घ्यायचे असेल तर त्याची ऑनलाईन नोंदणी कशी करायची याबद्दलच्या काही सोप्या स्टेप्स जाणून घेणार आहोत.
२२ तारखेला राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे. याच दिवशी रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राने या शुभ सोहळ्यानिमित्त विविध विधी आणि कार्यक्रमांचा समावेश असलेल्या सात दिवसांच्या वेळापत्रकाची बारकाईने रूपरेषा आखली आहे. श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने या सोहळ्यासाठी ७ हजार पेक्षा अधिक मान्यवरांना या सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे. ज्यामध्ये सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन , विराट कोहली, मुकेश अंबानी आणि गौतम अदानी, सरसंघचालक मोहन भागवत, लालकृष्ण आडवाणी, जेपी नड्डा, एकनाथ शिंदे यांसारख्या प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
आरतीचे पास ऑनलाइन कसे बुक करावे?
१. सर्वात प्रथम तुम्ही श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
२. त्यानंतर ओटीपी प्राप्त करण्यासाठी तुमच्या मोबाईल नंबरचा वापर करून लॉग इन करावे.
३. आरती किंवा दर्शन यासाठी स्लॉट बुक करण्यासाठी माय प्रोफाइलवर क्लीक करावे.
४. आरती व दर्शनासाठी तुमच्या सोयीची तारीख निवडावी.
५. त्यानंतर सर्व आवश्यक माहिती भरावी.
६. आरतीसाठी जाण्याआधी मंदिर परिसरातील काउंटरवरून तुम्ही तुमचा पास घ्यावा.