पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली येत्या तीन वर्षांमध्ये देश नक्षलवादाच्या समस्येतून १०० टक्के मुक्त होईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सीमा सुरक्षा बलाच्या शौर्याचे कौतुक केले. यावेळी ते म्हणाले, सीआरपीएफ, बीएसएफ यांच्यासोबतच सीमा सुरक्षा बलाने नक्षलवाद कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.
अमित शाह सीमा सुरक्षा बलाच्या ६० व्या स्थापना दिनाच्या प्रसंगी आसामधील तेजपूर येथे बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ”मला विश्वास आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली येत्या तीन वर्षांमध्ये देश नक्षलवादाच्या समस्येतून पूर्णपणे मुक्त होईल. नेपाळ आणि भूतान या मित्र देशांच्या सीमेचे रक्षण करण्याबरोबरच एसएसबीने छत्तीसगड, झारंखण्ड आणि बिहारमध्ये नक्षलवाद्यांशी लढा दिला आहे. मी जेव्हा-जेव्हा या भागात नक्षल कारवायांचा आढावा घेतला तेव्हा मी तुमच्या शौर्याबद्दल ऐकले आहे.”
जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी एसएसबीच्या भूमिकेवर शहांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, ” जम्मू आणि काश्मीरमध्ये एसएसबीने सीआरपीएफ , बीएसएफ, जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि भारतीय जवानांसोबत एकत्रितपणे लढताना आपल्या प्राणांची आहुती दिली आहे.” यावेळी अमित शाह यांनी सरकारच्या वतीने एसएसबीच्या ६० व्या स्थापना दिनानिमित्त टपाल तिकीट जारी केले आहे. केंद्र सरकारने केंद्रीय राखीव पोलीस दल आणि इतर सर्व सुरक्षा दलांच्या कल्याणासाठी अनेक पावले उचलली आहेत असे शाह म्हणाले. एसएसबीच्या ६० व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा देखील उपस्थित होते.