केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सीमा सुरक्षा बलाच्या ६० व्या स्थापना दिनाच्या प्रसंगी आसामधील तेजपूर येथे बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी भारत-म्यानमार सीमा अधिक सुरक्षित करणार असल्याचे सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली येत्या तीन वर्षांमध्ये देश नक्षलवादाच्या समस्येतून १०० टक्के मुक्त होईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. यावेळी त्यांनी सीमा सुरक्षा बलाच्या शौर्याचे कौतुक केले. यावेळी ते म्हणाले, सीआरपीएफ, बीएसएफ यांच्यासोबतच सीमा सुरक्षा बलाने नक्षलवाद कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.
आता म्यानमारच्या सीमेवर फेन्सिंग केले जाणार असल्याचे शाह यांनी सांगितले. हे फेन्सिंग भारत-बांग्लादेशच्या सीमेवर आहे त्याप्रमाणेच घालण्यात येणार आहे. त्यामुळे आता परवानगीशिवाय कोणालाही सीमा भागातून ये-जा करणे शक्य होणार नाही. म्यानमारचे सैनिक आणि घुसखोर यांनी मिझोराममध्ये खुसखोरी केली, यावर शाह बोलत होते. काही दिवसांपूर्वी भारत-म्यानमार यांच्यात सीमावाद सुरु होता. अनेकदा म्यानमारमधून घुसखोरी होत असल्याचे समोर आले होते. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच आता सीमेवर फेन्सिंग म्हणजेच कुंपण घातले जाणार आहे. तसेच लवकरच केंद्र सरकार याची अंमलबजावणी करणार असल्याचे शाह यांनी सांगितले.
दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी एसएसबीच्या भूमिकेवर शहांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, ” जम्मू आणि काश्मीरमध्ये एसएसबीने सीआरपीएफ , बीएसएफ, जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि भारतीय जवानांसोबत एकत्रितपणे लढताना आपल्या प्राणांची आहुती दिली आहे.” यावेळी अमित शाह यांनी सरकारच्या वतीने एसएसबीच्या ६० व्या स्थापना दिनानिमित्त टपाल तिकीट जारी केले आहे. केंद्र सरकारने केंद्रीय राखीव पोलीस दल आणि इतर सर्व सुरक्षा दलांच्या कल्याणासाठी अनेक पावले उचलली आहेत असे शाह म्हणाले.