उद्या (22 जानेवारी) अयोध्येत रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे संपूर्ण जगभरात उत्साहाचे वातावरण आहे. तर या सोहळ्यानिमित्त अनेक गायक-गायिकांनी श्रीरामाला समर्पित गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आणली आहेत. तसेच या श्रीरामावर आधारित गाण्यांना प्रेक्षकांनी देखील चांगलीच पसंती दर्शवली आहे. यामध्ये आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीसांचे देखील श्रीरामांबाबतचे एक गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
अमृता फडणवीस यांनी पुण्यात बोलताना याबाबतची माहिती दिली आहे. श्रीरामांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक गाणे लिहिले आहे आणि ते मी गायले आहे. तसेच हे गाणे प्रसिद्ध संगितकार अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे. आज पहिल्यांदाच मी या गाण्याबाबतची माहिती देत आहे. लवकरच हे गाणे प्रदर्शित होणार आहे, अशी माहिती अमृता फडणवीसांनी दिली आहे.
आज पु्ण्यात ‘वॉक फॉर नेशन’चे आयोजन करण्यात आले आहे. या वॉकथॉनचे नियोजन भाजप महिला मोर्चातर्फे करण्यात असून यामध्ये अमृता फडणवीस देखील सहभागी झाल्या आहेत. अमृता फडणवीसांसोबत या वॉकथॉनला भाजप नेते चंद्रकांत पाटील देखील उपस्थित आहेत. ही वॉकथॉन पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून सुरू होणार आहे. तर या वॉकथॉनमध्ये बोलताना अमृता फडणवीसांनी त्यांच्या नवीन गाण्याची घोषणा केली.
पुढे अमृता फडणवीसांनी उद्या होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याबाबत प्रतिक्रिया दिली. अयोध्येत प्रभू श्रीराम विराजमान होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्यामुळे हे स्वप्न पूर्ण होणार आहे. तसेच सगळ्या राम भक्तांसाठी हा सोहळा आंनदाचा सोहळा आहे, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.