उद्या (22 जानेवारी) अयोध्येत रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे या खास सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. एकिकडे या सोहळ्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे राम मंदिराच्या नावाने फसवणुकीची काही प्रकरणे समोर येत आहेत. उद्या होणारा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपूर्ण देशभरातील लोक लाइव्ह प्रक्षेपणाद्वारे पाहणार आहेत. पण या प्रक्षेपणावर सायबर हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकार सतर्क झाले आहे. अशातच आता राम मंदिराच्या नावाने बनावट प्रसादाचे ऑनलाईन विक्री प्रकरणही समोर आले आहे.
ॲमेझॉनवर राम मंदिराच्या नावाने बनावट प्रसादाची ऑनलाइन विक्री केली जात आहे. तसेच आता हे प्रकरण उघडकीस आले असून या फसवणूक प्रकरणी ॲमेझॉनला केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) नोटीस पाठवली आहे.
‘श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद’ या नावाने बनावट मिठाईची विक्री केल्याबद्दल केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ॲमेझोनला नोटीस पाठवली आहे. राम मंदिराच्या नावाखाली ॲमेझॉन बनावट मिठाईची विक्री करून फसवा व्यापार करत असल्याची तक्रार व्यापारी संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने केली होती. या तक्रारीनंतर केंद्र सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे.
ॲमेझोनला केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने नोटीस पाठवत सात दिवसांच्या आत उत्तर मागितले आहे. जर उत्तर दिले नाही तर ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या तरतुदीनुसार ॲमेझॉनवर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सरकारी निवेदनात देण्यात आली आहे.