आता सर्व रामभक्तांना जास्त वाट पहावी लागणार नाहीये. कारण उद्या (22 जानेवारी) अयोध्येत रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. तसेच हा खास सोहळा पार पडल्यानंतर त्याचदिवशी संध्याकाळी अयोध्या 10 लाख दिव्यांनी उजळून निघणार आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर घर, दुकाने, आस्थापना आणि पौराणिक स्थळांवर ‘रामज्योती’ प्रज्वलित करण्यात येणार आहेत. तसेच शरयू नदीच्या काठावर मातीच्या दिव्यांनी संपूर्ण अयोध्या उजळून निघणार आहे.
प्राण प्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाल्यानंतर ‘रामज्योती’ प्रज्वलित करून दिवाळी साजरी केली जाणार आहे. याबाबत प्रादेशिक पर्यटन अधिकारी (आरटीओ) आर. पी. यादव यांनी सांगितले की, 22 जानेवारीला संध्याकाळी 100 प्रमुख मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणी दीपप्रज्वलन केले जाणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे.
या दीपप्रज्वलनासाठी स्थानिक कुंभारांची मदत घेतली जात असून त्यांच्याकडून दिवे खरेदी केले जात आहेत. तर उद्या संपूर्ण अयोध्या दिव्यांनी सजवली जाणार असून त्यासाठी राज्याच्या पर्यटन विभागाकडून जोरदार तयारी केली जात आहे. रामलल्ला, कनक भवन, हनुमानगढ़ी, गुप्तरघाट, सरयू बीच, लता मंगेशकर चौक, मणिराम दास छावणीसह 100 मंदिरे, प्रमुख चौक आणि सार्वजनिक ठिकाणी दिवे लावले जातील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.