उद्या (22 जानेवारी) अयोध्येत रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे या सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. तसेच हा सोहळा देशभरातील लोकांना लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे पाहता येणार आहे. अशातच आता राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या लाईव्ह स्ट्रिमिंग लिंकवरून लोकांची फसवणूक केली जात असल्याची प्रकरणे समोर येत आहेत.
जर तुम्हाला व्हॉट्सअॅपवर उद्याच्या सोहळ्याची लिंक मिळाली तर तुम्ही चुकूनही ही लिंक उघडू नका. नाहीतर सायबर गुन्हेगार तुमचे खाते रिकामे करतील. कारण राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील उत्साहाचा फायदा सायबर घोटाळेबाज घेत आहेत. ते लोकांना व्हॉट्सअॅपवर उद्याच्या सोहळ्याची लाईव्ह स्ट्रीमिंग लिंक पाठवत आहेत. या लिंकवर क्लिक करताच खात्यातून पैसे कापले जात आहेत.
खरं तर, अयोध्येतील गृह मंत्रालयाच्या (MHA) सायबर शाखेच्या नियंत्रण कक्षाला अशा अनेक बनावट लिंक्सची माहिती मिळाली आहे. त्यावेळी सायबर गुन्हेगार लोकांच्या व्हॉट्सअॅपवर लाइव्ह स्ट्रीमिंग लिंक्स पाठवत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच, अयोध्येतून ‘प्रसाद’ वितरणाच्या नावावर, तुम्हाला लिंकवर क्लिक करून तपशील भरण्यास सांगितले जाते. तपशील भरताच, फसवणूक करणाऱ्यांना बँक खात्याची माहिती मिळते आणि काही सेकंदात तुमचे खाते रिकामे होते. त्यामुळे जर तुम्हाला अशी लिंक तुमच्या व्हॉट्सअॅपवर आली तर चुकूनही त्यावर क्लिक करू नका.