रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना होण्यासाठी अवघे काहीच क्षण उरले आहेत. लवकरच सर्व रामभक्तांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तब्बल ५०० वर्षांच्या मोठ्या संघर्षानंतर अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्राचे भव्य दिव्य मंदिर उभे राहिले आहे. देशवासीयांची स्वप्न सत्यात उतरले आहे. प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी अत्यंत नववधूप्रमाणे सजलेली दिसून येत आहे. आज पंतप्रधान नरेंद मोदी हे रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत अयोध्येत दाखल झाले आहेत. तर अनेक मान्यवरांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
दरम्यान, अयोध्येत अत्यंत जल्लोषाचे वातावरण आहे. अयोध्यानगरीत अखंड रामनामाचा जप सुरु आहे. आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराला आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली आहे. आज दुपारी १२.१५ ते १२. ५० या वेळेत गर्भगृहात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यासाठी केवळ ८४ सेकंदाचा मुहूर्त असल्याचे सांगण्यात येत आहे. आज संपूर्ण देश राममय झाल्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल होणार आहेत. अनेक साधू-संत, महंत तसेच सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, उद्योगपती मुकेश अंबानी, अनिल अंबानी आणि इतर प्रामुख्य निमंत्रित मान्यवर अयोध्येत दाखल झाले आहेत.