आज थोड्याच वेळात अयोध्येमध्ये राममंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. तसेच रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा देखील केली जाणार आहेत. मात्र अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभे राहावे यासाठी अनेकांनी संघर्ष केला आहे. त्यामध्ये एक नाव अत्यंत महत्वाचे आहे ते म्हणजे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी. १९९० च्या काळात राम मंदिराचे आंदोलन सुरु करून या लढ्याला दिशा देण्याचे काम लालकृष्ण आडवाणी यांनी केले. १९९० साली सोमनाथ येथून त्यांनी राम रथयात्रा देखील काढली होती. तसेच आजच्या सोहळ्यासाठी त्यांना देखील निमंत्रण देण्यात आले होते. विश्व हिंदू परिषदेचे आलोक कुमार आणि इतर मोठ्या अधिकाऱ्यांनी त्यांना या सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. मात्र आता लालकृष्ण आडवाणी या सोहळ्यात सहभागी होणार नाहीयेत.
सध्या उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे अयोध्येतील हवामान थंड आहे. यामुळे प्रकृतीच्या कारणांमुळे आणि तेथील थंड हवामानामुळे लालकृष्ण आडवाणी अयोध्येमधील या भव्य सोहळ्यामध्ये सहभागी होणार नाहीयेत. दरम्यान अयोध्येत अत्यंत जल्लोषाचे वातावरण आहे. अयोध्यानगरीत अखंड रामनामाचा जप सुरु आहे. आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराला आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली आहे. आज दुपारी १२.१५ ते १२. ५० या वेळेत गर्भगृहात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यासाठी केवळ ८४ सेकंदाचा मुहूर्त असल्याचे सांगण्यात येत आहे. आज संपूर्ण देश राममय झाल्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील साकेत हेलिपॅडवर दाखल झाले आहेत.