अयोध्या : आज (22 जानेवारी) अयोध्येत रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यासाठी राजकीय नेते, सेलिब्रिटी, उद्योगपती, विदेशी पाहुणे राम मंदिरात हजेरी लावत आहेत. यामध्ये आता देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा, उद्योगपती मुकेश अंबानी, त्यांचे कुटुंबीय आणि अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे अयोध्येत राम मंदिराच्या अभिषेकासाठी पोहोचले आहेत.
आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगल बिर्ला आणि अनन्या बिर्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी श्री रामजन्मभूमी मंदिर अयोध्येत पोहोचले आहेत.तर दुसरीकडे, रेमंड ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांनी राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी अयोध्येतील त्यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. सिंघानिया यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, “प्राण प्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी अयोध्येत आपले हार्दिक स्वागत. मी राम मंदिरात लाखो भाविकांसह हा ऐतिहासिक दिवस साजरा करण्यास उत्सुक आहे.”
तसेच या खास सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भारती एंटरप्रायझेसचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात पोहोचले. आहेत. सोबतच उद्योगपती अनिल अंबानी आणि अनिल सिंघानियाही प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अयोध्येत पोहोचले आहेत.
दरम्यान, या सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आलेल्या 500 हून अधिक पाहुण्यांच्या यादीत भारतीय उद्योगातील प्रसिद्ध दिग्गज आणि मनोरंजन, क्रीडा, संगीत आणि इतर क्षेत्रातील सेलिब्रिटींचा समावेश आहे.