अयोध्येतील ‘राम मंदिर’ अभिषेक सोहळ्यानंतर, स्टार ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नरने सोमवारी सोशल मीडियावर या सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त केला. डेव्हिड वॉर्नरने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर “जय श्री राम इंडिया” या कॅप्शनसह भगवान श्री रामचा फोटो पोस्ट केला आहे.
वॉर्नरचे भारतीय संस्कृतीवरील प्रेम सर्वश्रुत आहे. अनेकदा तो अॅक्शनमधून, चाहत्यांशी संवाद साधताना, लोकप्रिय भारतीय चित्रपट गाण्यांवर नाचताना आणि लोकप्रिय चित्रपटातील डायलॉग बोलताना दिसतो. तसेच वॉर्नरने बऱ्याचदा भारतीय अॅक्शन चित्रपटांबद्दलचे त्याचे प्रेमही व्यक्त केले आहे. तर आता त्याने रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
वॉर्नरसोबतच दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज, जो हिंदू कुटुंबातील आहे, त्यानेही प्राण प्रतिष्ठा सोहळ्याबाबत आपला आनंद व्यक्त केला आहे. याबाबतची एक पोस्ट त्याने X वर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने “जय श्री राम” असे लिहिले आहे.
तसेच अनिल दलपत यांच्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणारे दुसरे हिंदू असलेले पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज दानिश कनेरिया यांनीही या सोहळ्याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपली आहे, ‘प्राण प्रतिष्ठा’ पूर्ण झाली आहे,” असे कनेरिया यांनी म्हटले आहे.
दरम्यान, काल (22 जानेवारी) अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची विधीवत प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. त्यामुळे सध्या संपूर्ण जगभरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. तसेच प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल हे देखील गर्भगृहात उपस्थित होते.