काल (22 जानेवारी) अयोध्येत रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यानंतर आजपासून (23 जानेवारी) रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे. मात्र, मंदिरात दर्शन घेण्यासाठी रामभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
रामभक्तांच्या या वाढत्या गर्दीमुळे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने आता गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व सीमा पुन्हा सील केल्या आहे. आता अयोध्येकडे कोणत्याही वाहनाला जाऊ दिले जात नाहीये. तसेच ट्रॉली बॅरिअर्स आणि बांबूचे खांब लावून पोलीस कर्मचाऱ्यांसह निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत.
सीमा सील केल्यामुळे आता दर्शनासाठी आलेल्या लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. तर आता तेथून फक्त आपत्कालीन सेवा रूग्णवाहिका, पासधारक, परीक्षार्थी आणि शेतकऱ्यांना गॅस सिलिंडर, दूध भाजीपाला, डिझेल, पेट्रोल यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने यांची तपासणी करून त्यांना प्रवेश दिला जात आहे.
तसेच वाढत्या गर्दीमुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील तडकाफडकी अयोध्येत दाखल झाले आहेत. तसेच गर्दीचे नियोजन नीट न केल्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अधिकाऱ्यांवर नाराज झाले आहेत. त्यांनी आता हेलिकॉप्टरमधून मंदीर परिसराची तपासणी केली असून सीआरपीएफकडे गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी जबाबदारी दिली आहे.