आज बारामती अॅग्रो प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. तर ईडी चौकशीला कार्यालयात जाण्यापूर्वी रोहित पवारांनी विधानभवनाला भेट दिली. त्यानंतर आता ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत.
ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी रोहित पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयात गेले आणि तेथे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि कार्यकर्त्यांची भेट त्यांनी घेतली. भेट घेतल्यानंतर ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी रवाना झाले असता त्यांना कार्यालयापर्यंत सोडण्यासठी सुप्रिया सुळे गेल्या होत्या. यावेळी सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना संविधानाची प्रत भेट दिली.
रोहित पवारांना ईडी कार्यालयात सोडल्यानंतर सुप्रिया सुळेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, सत्यमेव जयते, विजय हा सत्याचाच होईल. हा काळ संघर्षाचा असून आव्हाने येत आहेत. पण आम्ही या आव्हानांवर मात करू आणि सत्याच्याच मार्गाने चालू.
पुढे त्या म्हणाल्या की, दुर्दैवाने अनेक एजन्सीचा गैरवापर केला जात आहे. रोहित पवारांना ईडीची नोटीस येणे ही आमच्यासाठी आश्चर्याची गोष्ट नाही. कारण त्यांनी संघर्ष यात्रा काडली, विद्यार्थी, शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी काहीतरी करू पाहणाऱ्या रोहित पवारांवर कारवाई होत आहे, हे सुडाचे राजकारण असून याबाबतची चर्चा अनेकदा माझ्या कानावर आली आहे.
माझा ईडीवर पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे की, ते रोहित पवारांची बाजू ऐकून घेतील. आम्ही या चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार आहोत, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.