22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला. विशेष म्हणजे रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेवेळी पंतप्रधान मोदींनी काही भेटवस्तूही दिल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरुचिरापल्ली येथील श्री रंगनाथ स्वामी मंदिरातून आणलेल्या भेटवस्तू अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिराला दिल्या आहेत. तसेच श्री रंगनाथ स्वामी मंदिराचे मुख्य पुजारी सुंदर भटार यांनी माध्यमांना माहिती दिली की, “मोदींनी दिलेल्या भेटवस्तूंमध्ये दोन रेशमी धोतर आणि तीन रेशमी साड्यांचा समावेश आहे. तसेच टोपलीत काही फळेही आहेत. श्री रंगनाथ स्वामी हे प्रभू रामाच्या घराण्यातील असल्याने परमेश्वरासोबतचे परस्पर संबंध प्रस्थापित करण्यासाठी या भेटवस्तू देण्यात आल्या.”
यासोबतच पंतप्रधान मोदींनी लाल स्कार्फवर ठेवलेली मौल्यवान चांदीची छत्रीही भेट दिली आहे. ती छत्री घेऊनच ते 22 जानेवारीला मंदिराच्या गर्भगृहात पोहोचले होते.
दरम्यान, रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून लोक येत आहेत. या पार्श्वभूमीवर भाविकांची वाढती संख्या पाहता मंदिर प्रशासनाने दर्शनाच्या वेळेत बदल केले आहेत.आधी रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी संध्याकाळी 7 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली होती. मात्र, आता या वेळेत बदल करण्यात आले आहेत. मंदिर प्रशासनाने आता दर्शनाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता भाविक रामलल्लाचे दर्शन रात्री 10 वाजेपर्यंत घेऊ शकतात. तसेच सकाळी भाविकांना 7 ते 11.30 या वेळेत दर्शन घेता येणार आहे.
रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी भाविक रात्रीपासून रांगेत उभे राहत आहेत. त्यामुळे मंदिर प्रशासनाकडून गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच पोलिसांनी रामलल्लाच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांच्या तीन रांगा बनवल्या आहेत. तर कालच्या तुलनेत आज मंदिर परिसरात चांगली व्यवस्था केली आहे.