22 जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला. अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटनाने संपूर्ण देश राममय झाला आहे. अशातच आता विशेष गोष्ट सांगायची झाली तर, अयोध्या राम मंदिराचे उद्घाटन आणि अभिषेक सोहळा सुरू असतानाच तेथून सुमारे 1000 किलोमीटर अंतरावर असलेल्या आणखी एका राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले होते. या राम मंदिराचे उद्घाटनही मोठ्या थाटात करण्यात आले होते.
एकीकडे अयोध्या राम मंदिराचा अभिषेक सुरू असतानाच दुसरीकडे ओडिशातील फतेहगढ, नयागडमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या 73 फूट उंचीच्या राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे रामभक्तांना एकाच दिवसात दोन राम मंदिरे मिळाली. ओडिशातील हे राम मंदिर गावातील लोकांसाठी खूप खास आहे. हे मंदिर बांधण्यासाठी 7 वर्षे लागली होती.
तसेच ज्याप्रमाणे अयोध्या राम मंदिराच्या व्यवस्थापनासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आहे, त्याचप्रमाणे या राम मंदिरासाठीही एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या शुभ सोहळ्याचा सन्मान करण्यासाठी लोकांनी मिळून एक समिती स्थापन केली, तिला ‘श्री राम सेवा परिषद समिती’ असे नाव देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे राम मंदिर 165 फूट उंचीवर बांधण्यात आले आहे. या मंदिराच्या उभारणीत राज्यातील ग्रामस्थांचे मोठे योगदान आहे. लोकांनी दिलेल्या देणगीतून हे मंदिर बांधण्यात आले आहे. ज्या गावात मंदिर बांधले आहे त्या गावातील रहिवाशांनीही आवश्यक पैसे देऊन बांधकामासाठी मदत केली आहे. तसेच या मंदिराचे बांधकाम 2017 मध्ये सुरू झाले होते आणि ते पूर्ण होण्यासाठी 7 वर्षे लागली. 150 हून अधिक कामगारांनी मिळून या मंदिराचे बांधकाम केले आहे. तर 73 फूट उंच बांधलेल्या या मंदिराच्या गर्भगृहाची उंची 65 फूट आहे.
ओडिशामध्ये बांधलेले हे विशेष राम मंदिर प्रसिद्ध तारा तारिणी आणि कोमार्क वास्तुशैलीमध्ये बांधले गेले आहे. या बांधकाम शैलीवर आधारित, मंदिराभोवती भगवान गणेश, भगवान शिव, भगवान हनुमान आणि सूर्यदेव यांना समर्पित मंदिरे देखील आहेत.