केंद्रातील मोदी सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत करायचे या उद्देशाने देशातील सर्व विरोधक एकत्रित आले होते. या सर्वांच्या आघाडीला त्यांनी ‘इंडिया’ आघाडी असे नाव दिले आहे. मात्र या ‘इंडिया’ आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कारण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी या आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, यावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाष्य केले आहे.
जयराम रमेश म्हणाले, ”तृणमूल काँग्रेस पक्ष ‘इंडिया’ आघाडीतील एक महत्वाचा भाग आहे. ममता बॅनर्जींशीवाय या आघाडीची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. तुम्ही ममता बॅनर्जी यांचे संपूर्ण विधान ऐकले नाही. आम्ही भाजपाला पराभूत करण्यासाठी एक पाऊल देखील मागे येणार नाही. त्याच भावनेने आम्ही पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करत आहोत. हा सर्व प्रवास लांबचा आहे. त्यात अडथळे येऊ शकतात म्हणून त्याचा अर्थ असा नाही की, आम्ही हा प्रवास थांबवावा. तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी या ‘इंडिया’ आघाडीचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे असे,राहुल गांधी यांनी काल स्पष्ट केले होते. ममता बॅनर्जींशीवाय आम्ही ‘इंडिया’ आघाडीची शकत नाही. ” दरम्यान काँग्रेसकडून असे वक्तव्य आल्याने पक्ष ममता बॅनर्जी यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी म्हणाल्या, ”काँग्रेस पक्षाबरोबर माझी कोणतीही चर्चा झाली नाही. मी नेहमी म्हटले आहे की, बंगालमध्ये आम्ही स्वबळावर लढू. देशात काय होईल याची मला चिंता नाही. आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष आहे आणि बंगालमध्ये आम्ही स्वबळावर लढू. मी अनेक प्रस्ताव दिले मात्र सुरुवातीपासूनच ते धुडकावले गेले.”
दरम्यान, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आमची इंडिया आघाडी मजबूत असून, केंद्र सरकारविरोधात ताकदीने निवडणूक लढणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता तृणमूल काँग्रेस पक्ष पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवणार आहे. यासंदर्भात ममता बॅनर्जी यांनी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाशीही युती करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ज्या-ज्या- वेळेस इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपावर चर्चा झाली त्या-त्या वेळेद ममता बॅनर्जी या जागा देण्यासाठी फारशा इच्छुक नव्हत्या.
केंद्रातील मोदी सरकारला हरवण्यासाठी देशातील सर्व विरोधक एकत्रित आल्याचे पाहायला मिळत आहे. काहीही करून मोदी सरकारला पराभूत करायचेच या निर्धनराने सर्व विरोधक इंडिया आघाडीखाली एकत्रित आले आहेत. मात्र ममता बॅनर्जी यांच्या घोषणेमुळे विरोधकांच्या एकजुटीला मोठा सुरुंग लागलेला पाहायला मिळतो आहे. आता पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस लोकसभेच्या ४२ च्या ४२ जागा लढवणार आहे. काँग्रेसने माझा कोणताही प्रस्ताव मान्य केला नाही असे बॅनर्जी म्हणाल्या आहेत. दरम्यान, याआधी पाटणा,बंगळुरू आणि मुंबई येथे इंडिया आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या महत्वाच्या बैठकी झाल्या होत्या. यावेळी राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेचे निमंत्रण देखील तृणमूल काँग्रेसला मिळाले नसल्याचे देखील तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे.